हिंगोली – एकीकडे केंद्रसह राज्य सरकार देखील राज्यात पेट्रोल डिझेलचा तुटवडा नसल्याचे सांगत आहे तर दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर रांगा पाहायला मिळत आहे. या दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डिझेल न मिळाल्याने एक गरोदर महिलेला आपलं बाळ गमवावं लागल. डिझेल नसल्याचं कारण देत एका गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारण्यात आली. यामुळे एका निष्पाप बाळाचा जन्माच्या आधीच आईच्या पोटातच मृत्यू झाला. ही संतापजनक घटना हिंगोली जिल्हयातील औंढा तालुक्यातील जवळा बाजारामध्ये घडली.
हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथील मनीषा इंगळे या गर्भवती महिलेला प्रसूती सुरू झाल्या. त्यामुळे त्यांना जवळाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं. मात्र या गर्भवती महिलेची प्रकृती गंभीर असल्याने डाक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी हिंगोलीच्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. हिंगोलीत जाण्यासाठी महिलेच्या कुटुंबीयांनी 108 आणि 102 या क्रमांकाच्या रुग्णवाहिकाना संपर्क केला. मात्र रुग्णवाहीकेत डिझेल नाही. त्यामुळे रुग्णवाहीका देता येणार नाही, असं सांगण्यात आल्याचा आरोप गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
गरोदर माता वेदनेने विवळत असल्याने अखेर नातेवाईकांनी खासगी रुग्णवाहिका बोलावून हिंगोलीचं शासकीय रुग्णालय गाठलं. मात्र उपचाराला उशीर झाल्याने तिथे जे घडलं ते सगळ्यांनाच हादरवून टाकणार होतं. कारण प्रसुतीदरम्यान मनीषा इंगळे यांच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याचं डाॅक्टरांनी नातेवाईकांना सांगितलं आणि यामुळे नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकली. आपल्या मुलीला काही झालं असतं तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न गर्भवती महिलेच्या आईने उपस्थित केला आहे.
आम्ही 850 चं डिझेल टाकून स्वतः गाडी केली आणि हिंगोलीतल्या रुग्णालयात ॲडमिट केलं. पण तोपर्यंत उशीर झाला. कारण इथे आल्यावर आम्हाला डाॅक्टर म्हणाले कि तुम्ही लवकर आला असतात तर बाळ वाचू शकलं असतं. पण तुम्हाला यायला उशीर झाल्यामुळे बाळ वाचलं नाही, असं खंत महिलेच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.
या धक्कादायक प्रकारानंतर हिंगोलीच्या शासकीय रुग्णालायने मात्र हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. रुग्णवाहिकेत डिझेल उपलब्ध होतं मात्र चालक उपलब्ध नव्हता, असे भलतेच कारण त्यांनी दिले. मात्र आता माध्यमांमध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मात्र त्यांनी चार जणांची चैकशी समिती नेमली आहे.
एकीकडे राज्य सरकारकडून सांगितलं जात आहे कि राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नाही तर दुसरीकडे अशी स्थिती आहे कि पेट्रोल पंपावर पेट्रोल- डिझेल मिळून राहिलेले नाही. रुग्णवाहीकेत डिझेल नसल्यामुळे ती रुग्णाला देता आला नाही. यामुळे एका गरोदर मातेला आपल्या नवजात बाळाला मुकावं लागलं. जर राज्यात डिझेलची टंचाई नाही तर मग एका गरोदर मातेला दीड तास रुग्णवाहिकेसाठी का ताटकळत राहावं लागलं? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
दरम्यान या घटनेवरून शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या कि इंधन तुटवडा नाही अशा घोषणा सरकारकडून केल्या जातात, अशा वेळेस हिंगोलीमध्ये ही घटना घडली आहे. फक्त रुग्णवाहिकेला तिथे इंधन मिळालं नाही, म्हणून आज एका मातेला तिचं बाळ गमवावं लागलं या हत्येसाठी सरकार जबाबदार आहे, असा आरोप रोहिणी खडसे यांनी सरकारवर केला.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






