​वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला; निरीक्षक, कर्मचाऱ्यांसह संपूर्ण पथक जखमी

SHARE:

छ. संभाजीनगर – वॉरंट बजावण्यासाठी आलेल्या पोलिस पथकावर स्थानिकांनी हल्ला केला आहे, या घटनेत निरीक्षकांसह संपूर्ण पोलिस पथक जखमी झाले आहे. संभाजीनगरमध्ये कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पळशी गावातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून एका कुख्यात गांजा तस्कराला अटक वॉरंट बजावण्यासाठी आलेल्या पोलीस पथकावर स्थानिक तस्कराने 30 जणांचा जमाव जमवून हल्ला केला आहे.

या दगडफेक आणि लाठीहल्ल्यात विशाखापट्टणमच्या पोलीस निरीक्षकांसह संपूर्ण पोलीस पथक गंभीर जखमी झाले आहे. हल्लेखोरांनी पोलिसांना बेदम मारहाण केली आहे. या घटनेत गांजा तस्कराला पोलिसांच्या ताब्यातून पळवून लावले आहे. या गोंधळाचा फायदा घेत हल्लेखोरांनी एका पोलीस अधिकाऱ्याची सोनसाखळी चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. परराज्यातील पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या मुख्य गांजा तस्कराचे नाव गणेश मुरलीधर पवार रा. पळशी असे आहे.

तर परराज्यांतील पोलिसांवर हल्ला करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष भाऊसाहेब पळसकर, रावसाहेब विनायक पळसकर आणि शिवाजी रावसाहेब पळसकर सर्व राहणार पळशी, संभाजीनगर या आरोपींची नावे समोर आली आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणम येथे नोंद असलेल्या एका मोठ्या गांजा तस्करीच्या गुन्ह्यात गणेश मुरलीधर पवार हा मुख्य संशयित आरोपी आहे. त्याला अटक करण्यासाठी विशाखापट्टणम पोलिसांचे एक पथक अटक वॉरंट घेऊन पळशी गावात दाखल झाले होते.

परराज्यातील पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत गणेश पवार याला अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारवाई सुरू असतानाच गावातून 30 जणांचा स्थानिक जमाव गोळा झाला. या जमावाने विशाखापट्टणम पोलिसांवर अचानक लाठ्या-काठ्या आणि दगडफेक केली आहे. जमावाने केलेल्या या दगडफेकीत पोलीस निरीक्षकांसह संपूर्ण पथक गंभीर जखमी झाले आहे. आरोपीच्या साथीदारांनी त्याला पोलिसांच्या विळख्यातून सोडवून पळवून लावले.

तर यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याच्या गळ्यातील सोन्याची साखळीही चोरल्याचाचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेतील जखमी पोलीस अधिकाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. परराज्यातील पोलीसही आता महाराष्ट्रात सुरक्षित नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment

अधिक वाचा