मानधनासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा एल्गार; १ जूनपासून राज्यभर ‘कामबंद’ आंदोलनाचा इशारा

SHARE:

नाशिक – मागील 6 महिन्यांपासून मानधन प्रलंबित असल्याने कंत्राटी कर्मचारी, 1 जूनपासून कामबंद आंदोलन करणार आहेत. नाशिकमधील पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचारी 6 महिने मानधनाविना आहेत. थकीत मानधनासाठी नाशिकमधील पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचार्यांनी 1 जून 2026 पासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत जिल्हा व तालुका स्तरावर कार्यरत कंत्राटी कर्मचारी पाणी व स्वच्छतेची कामे करत आहेत.

मात्र गेल्या 6 महिन्यांपासून मानधन प्रलंबित असल्याने महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचारी संघटनेने राज्य सरकारकडे निवेदन सादर केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास 1 जून 2026 पासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्यातील पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचारी संघटनेने दिला आहे. या संदर्भातील निवेदन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना देण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना, स्वच्छ भारत अभियान तसेच जल जीवन मिशन यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी जिल्हा व तालुका स्तरावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून केली जाते. डिसेंबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीतील 5 महिन्यांचे मानधन अद्याप मिळालेले नाही. मे महिना संपत आला असून एकूण 6 महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने घरखर्च, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च आणि दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाल्याची व्यथा कर्मचाऱ्यांनी निवेदनातून मांडली आहे.

मानधनाबाबत राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने मिळाल्याचा आरोप राज्यातील पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचारी संघटनेने केला आहे. शासनाच्या चुकीच्या भूमिकेमुळे राज्यातील पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचाऱ्यांमनी तीव्र नाराजी व्यक्कत केली आहे. 1 जून 2026 पासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये प्रलंबित संपूर्ण मानधन तात्काळ सर्व कर्मचार्यांच्या बँक खात्यात जमा करणे आणि मानधनाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढणे यांचा समावेश आहे.

31 मे 2026 पर्यंत प्रश्न न सुटल्यास मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात 1 ते 5 जून 2026 च्या काळात जिल्हा परिषद कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 8 जून 2026 रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय ते मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात मागण्या मान्य होईपर्यंत राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.

आंदोलनामुळे पाणी व स्वच्छता विभागाचे विविध कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीस शासन आणि प्रशासन जबाबदार राहणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. नाशिकमधील कंत्राटी कर्मचारी मानधन थकल्यामुळे सरकार विरोधात संतप्त झाले आहेत.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment

अधिक वाचा