अदानी मुंद्रा पोर्टवर अंमली पदार्थांचा मोठा राडा: ११८ किलो कोकेनसह तिघांना अटक

SHARE:

गुजरात – गेल्या वर्षी एप्रिलमध्ये गुजरात राज्यातील पोरबंदरच्या किनाऱ्यावरून अंदाजे 1,800 कोटी रुपये किमतीचे 300 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. दरम्यान आता कच्छ येथील अडाणीच्या मुंद्रा बंदराजवळ अंदाजे 1,180 कोटी रुपये किमतीचे 118 किलो कोकेन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी तीन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे, तर एक संशयित समुद्रात उडी मारून पळून गेला. गुजरात एटीएस आणि भारतीय तटरक्षक दलाने ही कारवाई केली असून गेल्या काही महिन्यांतील सर्वात मोठ्या अमली पदार्थ जप्तींपैकी एक कारवाई मानली जात आहे.

गुजरातचे डीजीपी डॉ. के. एल. एन. राव यांच्या म्हणण्यानुसार, गुप्त माहितीच्या आधारे अडाणीच्या मुंद्रा किनाऱ्याजवळ एक संयुक्त पाळत मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान, भारतीय सागरी हद्दीत एक कंटेनर जहाज संशयास्पद स्थितीत आढळले. एटीएस अधिकाऱ्यांनी सांगितले की हे जहाज मुंद्रा किनाऱ्यापासून सुमारे 5 सागरी मैल अंतरावर ठेवले होते. अनेक तास पाळत ठेवल्यानंतर, काही पिशव्या समुद्रात फेकल्या जात असल्याचे दिसून आले. यानंतर, तटरक्षक दल आणि एटीएसच्या पथकांनी तात्काळ जहाजाला वेढा घातला आणि मोठ्या प्रमाणात कोकेन जप्त केले.

तपास यंत्रणांचा असा विश्वास आहे की, हे अमली पदार्थ एका आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी नेटवर्कचा भाग असू शकतात. तपासात असे उघड झाले आहे की हे जहाज ब्राझीलमधून निघाले आणि अनेक लॅटिन अमेरिकन देश, मेक्सिको, अमेरिका आणि कराचीमार्गे गुजरातमध्ये पोहोचले. अटक केलेले दोघेही परदेशी नागरिक आहेत. मूळचा नायजेरियाचा असलेला आणखी एक संशयित, जुम्मा नासिर उमर यालाही अटक करण्यात आली आहे. मात्र या कारवाईदरम्यान, एक संशयित समुद्रात उडी मारून पळून गेला. त्याचा शोध सुरू आहे.

चौकशीदरम्यान, अटक केलेल्या संशयितांनी उघड केले की, कोकेनचा हा माल दिल्लीच्या द्वारका परिसरात राहणाऱ्या दोन व्यक्तींना पोहोचवायचा होता. सध्या, या संपूर्ण नेटवर्कमागे कोण आहे आणि देशातील कोणत्या शहरांमध्ये याचा पुरवठा करण्याचा उद्देश होता, याचा तपास एटीएस आणि केंद्रीय यंत्रणा करत आहेत. खरं तर, अलिकडच्या वर्षांत, गुजरातचा किनारा आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करांसाठी एक प्रमुख मार्ग म्हणून उदयास आला आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment