मुंबई – राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागातील 406 पदे अनेक वर्षांपासून रिक्त असून ही पदे या विभागाच्या योजना राबवण्यास अडसर ठरत आहे. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे.
उपमुख्यमंत्री आणि अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यातील अल्पसंख्याक विकास विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर सोमवारी मुस्लीम आमदारांची पहिलीच बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठवले आहे. या पत्रामध्ये अल्पसंख्याक विकास विभागातील रिक्त 406 पदे तातडीने भरावीत, मार्टी संस्थेच्या कामास गती द्यावी, भिवंडीतील उर्दू घराचा प्रस्ताव मार्गी लावावा अशा अनेक मागण्या त्यांनी केल्या आहेत.
आमदार रईस शेख यांनी पत्रात नमूद केले आहे कि गेल्या अनेक वर्षांपासून अल्पसंख्याक विकास विभागातील 406 पदे रिक्त आहेत. तसेच अल्पसंख्याक आयुक्तालयातील 36 आणि जिल्हा कार्यालयातील 85 नवी पदे अद्याप भरलेली नाहीत. अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे (मार्टी) कामकाज अद्याप सुरळीत झालेले नाही. त्याला गती देणे आवश्यक आहे. भिवंडीतील उर्दू घराचा प्रस्ताव सादर केला, मात्र काम सुरु झालेेले नाही. तसेच लोकराज्य मासिकाची उर्दू आवृत्ती तातडीने सुरु करण्याची गरज आहे.
आमदार रईस शेख पत्रात नमूद केले आहे की गेल्या अनेक वर्षांपासून मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने दिल्या जाणार्या शैक्षणिक कर्जाच्या अटी शिथील करण्याची मागणी प्रलंबित आहे. ती शिथिल करावी. उर्दू साहित्य अकादमीच्या अधिक्षक व कार्यकारी अधिकार्यांना आर्थिक अधिकार दिलेले नसून या कार्यालयाच्या नूतनीकरणाची बाब प्रलंबित आहे. या कार्यालयाचे नूतनीकरण करावे. टाटा समाज विज्ञान संस्थेला मुस्लिमांच्या सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणाचे काम देऊन चार वर्षे उलटल्यानंतरही अद्याप कार्यारंभ आदेश दिलेला नाही. मुस्लीम समाजाच्या विकासासाशी या सर्व प्रलंबित बाबी संबंधित असून त्या तातडीने मार्गी लागणे आवश्यक आहे, असे आमदार रईस शेख यांनी पत्रात नमूद केले आहे.
दिवगंत अजित पवार यांनी अल्पसंख्याक विकास विभागाला न्याय देण्याचा नेहमी प्रयत्न केला. आता त्यांची अपुरी राहिलेली कामे आपण मार्गी लावावीत, असा आग्रह आमदार रईस शेख यांनी पत्रामध्ये केला आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






