​दुग्ध उत्पादक संस्थेवर एफडीएची कारवाई; २६ लाखांचा साठा जप्त

SHARE:

वर्धा – अन्न व औषध प्रशासनाची दुग्ध उत्पादक संस्थेवर कडक कारवाई केली आहे. या कारवाईत 25 लाख 86 हजारांचा दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. वर्ध्याच्या गोरस भंडारवर धड टाकून उत्पादन निर्मिती बंद करण्यात आली आहे. खाद्यपदार्थ तसेच अन्य दुग्धजन्य पदार्थसाठी ग्राहकांच्या उड्या गोरस भंडार या संस्थेवर पडत असतात. मात्र ही संस्था अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे चर्चेत आली आहे. वर्धा येथील मगनवाडी परिसरातील गो दुग्ध उत्पादक संस्थेवर अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने रविवार 31 मे 2026 रोजी धाड टाकली आहे.

या कडक कारवाईत 25 लाख 86 हजार 168 रुपयांचा संशयास्पद व असुरक्षित दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासनाने दुग्ध उत्पादक संस्थेची दुध उत्पादन प्रक्रिया बंद केली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या नागपूर कार्यालयाला मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कडक कारवाई करण्यात आली होती. प्रशासनाचे नागपूर येथील अन्न सुरक्षा अधिकारी तसेच वर्ध्याचे अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने मगनवाडी, वर्धा येथील गोरस भंडार या दुग्ध उत्पादन केंद्राला अचानक भेट देऊन तपासणी केली आहे.

या तपासणीत अत्यंत असुरक्षित, अस्वच्छ आणि अन्न कायद्याच्या नियमांना डावलून अन्नपदार्थांचे उत्पादन होत असल्याचे उघडकीस आले आहे. कारवाईच्या वेळी तिथे गाईचे दूध, तूप, ताक, बटर मिल्क आणि खवा हे अन्नपदार्थ मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी व साठवणुकीसाठी उपलब्ध असल्याचे दिसून आले. या साठ्याबाबत पथकाला तीव्र संशय आल्यामुळे अन्न सुरक्षा अधिकारी यांनी 4 ही अन्नपदार्थांचे कायदेशीर नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेतले. हे नमुने शासकीय प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या दुग्ध संस्थेविरुद्ध न्यायालयीन व फौजदारी कारवाई करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

यापूर्वीही 50 हजारांचा दंड या दुग्धसंस्थेस करण्यात आला आहे. वर्धा येथील दुग्ध उत्पादक सहकारी संस्था या दुग्ध उत्पादक संस्थेची ही पहिलीच अनियमितेची वेळ नाही. यापूर्वीही ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करत कमी दर्जाच्या व निकृष्ट अन्नपदार्थांची विक्री केल्याबद्दल या दुग्धसंस्थेला प्रशासनाकडून 50 हजार रुपयांचा दंड झाला होता. मात्र, या कडक कारवाई नंतरही व्यवस्थापनाने आपल्या कारभारात कोणतीही सुधारणा केली नाही. पुन्हा असुरक्षित वातावरणात बेकायदेशीरपणे दुग्ध उत्पादन सुरू असल्याचे समोर आले आहे. अन्न सुरक्षा परवाने व नोंदणी नियमन 2011 मधील नियमन 2.1.14 चा आधार घेत प्रशासनाने संस्था पूर्णपणे बंद करण्याची नोटीस देण्यात आली.

तसेच, उत्पादन करून बाजारात वितरित केले गेलेले, सर्व अन्नपदार्थ ग्रा्राहकांकडून व बाजारातून परत गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थ भेसळखोरांना इशारा दिला आहे. ते म्हणाले की, जनतेच्या आरोग्याशी होणारा कोणताही खेळ अजिबात सहन केला जाणार नाही. नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यात कोणीही पैशांच्या हव्यासापोटी भेसळ केल्यास अथवा प्रतिबंधित आणि असुरक्षित अन्नपदार्थांची साठवणूक वा विक्री केल्यास, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कडक कारवाई केली जाईल. नागरिकांनी जागरूक राहून तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अन्न व औषध प्रशासनाने या कारवाईच्या निमित्ताने सर्वसामान्य जनतेलाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बाजारातील कोणत्याही अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत किंवा भेसळीबाबत शंका आल्यास नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधवून तक्रार नोंदवावी. तक्रार करताना त्यात स्वतःचे नाव, अचूक पत्ता, मोबाईल क्रमांक तसेच संबंधित संशयास्पद संस्थेचा पूर्ण पत्ता आणि कोणत्या अन्नाबाबत तक्रार आहे, याची माहिती नमूद करावी, जेणेकरून कारवाई करणे शक्य होईल. तक्रारदाराचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, अशी माहिती सहाय्यक आयुक्त अन्न, अन्न व औषध प्रशासन, वर्धा यांनी दिली आहे. या कारवाईमुळे वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment