​’लाडकी बहीण’ योजना वादाच्या भोवऱ्यात: १.२५ कोटी महिला अपात्र ठरल्याचा सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट

SHARE:

मुंबई – एक दिवसापूर्वी राज्याच्या लाडकी बहिण योजनेतून 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याचं समोर आलं होत. आता सुमारे एक कोटी 25 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याचा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. लाडकी बहिण योजनेच्या पोर्टलवरील आकडेवारीवरून त्यांनी हा दावा केला आहे.

यंदाच्या हफ्त्यात 50 लाखांहून अधिक लाडक्या बहिणींना पैसे मिळालेच नाहीत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना चर्चेत आली आहे. या योजनेतून 80 लाख महिलांना विविध कारणास्तव वगळण्यात आल्याचं समोर आलं. निवडणुकांवेळी सरकारने पात्रतेच्या निकषाला कात्री लावली होती, मात्र आता निकष देऊन लाडक्या बहिणींना योजनेतून अपात्र करण्यात येत आहे. याचदरम्यान सुप्रिया सुळे यांनी नवा दावा केला आहे. योजनेतून 80 लाख नाही तर जवळपास एक कोटी 25 लाखांहूंन अधिक महिलांना अपात्र करण्यात आल्याचा खुलासा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

सुप्रिया सुळेंनी ट्विटरवर पोस्ट करत म्हटलंय की लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरुवातीला 2 कोटी 37 लाख महिलांना लाभ दिल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला होता. डिसेंबर 2024 पर्यंत या महिलांना तब्बल 17,505 कोटींपेक्षा अधिक रक्कम वितरित झाल्याची माहिती देखील देण्यात आली. पुढे या योजनेअंतर्गत लाभार्थी संख्या 2 कोटी 46 लाख ते 2 कोटी 48 लाखांपर्यंत गेल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ईकेवायसी बंधनकारक केल्यानंतर टप्प्याटप्प्याने लाभार्थी संख्या कमी होत गेली. माध्यमांमधील सध्याच्या आकडेवारीनुसार तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरविण्यात आल्याचे सांगितले जात आहे आणि आता सुमारे 1 कोटी 66 लाख महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार असल्याचे समोर येत आहे.

मात्र लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरील प्रत्यक्ष आकडे पाहिले असता अर्जांची आणि मंजूर लाभार्थ्यांची संख्या आणखीच कमी दिसत आहे. पोर्टलवर एकूण अर्जांची संख्या फक्त 1 कोटी 12 लाख तर मंजूर अर्जांची संख्या फक्त 1 कोटी 6 लाख इतकीच दिसत आहे. म्हणजे डिसेंबर 2024 मधील आकडेवारी गृहीत धरली तर तब्बल 1 कोटी 25 लाखांहून अधिक महिलांना या योजनेतून अपात्र ठरविण्यात आल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

जर शासनानुसार आजही 1 कोटी 66 लाख ते 1 कोटी 68 लाख लाभार्थी असतील, तर पोर्टलवर त्यापेक्षा कमी आकडे का दिसत आहेत? सुरुवातीला जाहीर केलेले लाभार्थी नेमके कोण होते? पडताळणीदरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिलांना अपात्र का ठरवण्यात आले? या सर्व बाबींवर सरकारने स्पष्ट, सविस्तर आणि पारदर्शक भूमिका मांडणे आवश्यक आहे. असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

यावर शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, ते म्हणाले कि लोकसभा निवडणुकीत झालेली वाताहत पाहता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांना सरसकट लाडकी बहीण योजनेंतर्गत पैसे वाटण्याचा कार्यक्रम हाती घेतला. आता याच लाडकी बहीण योजनेच्या तब्बल 80 लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो अशीच काहीशी गत आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. आज 80 लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवले गेले आहे. उद्या आणखी काही लाख महिलांना काही कारणं दाखवून अपात्र केले जावू शकते आणि हळूहळू शासनाने ही योजना बंद केली तर फार आश्चर्य वाटणार नाही.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

मुख्य संपादक सा. रयत रक्षक, महाराष्ट्र. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र.

Leave a Comment