जागतिक योग दिनानिमित्य विशेष अभंग…

SHARE:

दि.२१ जून २०२६ ला असलेल्या ” जागतिक योग दिना ” निमित्त अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा अभंग वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.

विश्व योग दिन

एकवीस जून । विश्व योग दिन ।।
आरोग्याचा दिन । जगात या ।।१।।

ध्यान प्राणायाम । वृद्धिंगत मन ।।
सुदृढ हे तन । होत असे ।।२।।

योग नि योगाने । प्रतिमा जगात ।।
होई वृद्धिंगत । भारताची ।। ३।।

शारीरिक रोग । नष्ट होई सर्व ।।
आनंदाचे पर्व । जीवनात ।। ४।।

योगानेच होई । मनाची ही शांती ।।
शरीराची क्रांती । जीवनात ।। ५ ।।

योगाने होणारं । आरोग्य निरोगी ।।
भारतात रोगी । नसणार ।। ६ ।।

प्रत्येकासाठीच । योग अनमोल ।।
जाणावे हे मोल । सर्वांनीच ।। ७ ।।

योग करतात । कुठे सामूहिक ।।
कुठे वैयक्तिक । भारतात ।। ८ ।।

करू नये योग । एकाच दिवशी ।।
व्हावी रोजनिशी । माणसांची ।। ९ ।।

तन मन बुद्धी । जोडणारे शास्त्र ।।
योग हेच शास्त्र । जीवनात ।। १० ।।

धावणे-पोहणे । वेगाने चालणे ।।
योगा हा करणे । नियमित ।। ११ ।।

आहार-विहार । विश्रांती नि योग ।।
दूर होई रोग । जीवनात ।। १२ ।।

ताण नि तणाव । योगामुळे जाई ।।
पळूनच जाई । पूर्ण व्याधी ।। १३ ।।

प्राणायाम करा । सूर्यनमस्कार ।।
रक्ताचा संचार । शरीरात ।।१४ ।।

वाढविते योग । फुफ्फुस क्षमता ।।
रक्ताची शुद्धता । वृद्धिंगत ।।१५ ।।

असू द्यावे शुद्ध । आचार-विचार ।।
राहुनिया दूर । व्यसनाच्या ।।१६ ।।

मनुष्य संस्कृती । जपणारे शास्त्र ।।
योग एक शास्त्र । भारतात ।।१७ ।।

जीवनात करू । नियमित योग ।।
दूर होई रोग । तयांचेच ।। १८ ।।

निरोगी शरीर । प्रसन्न हे मन ।।
आरोग्य हे धन । सर्वोत्तम ।। १९ ।।

जागतिक योग । दिनाच्या शुभेच्छा ।।
मनस्वी सदिच्छा । सर्वांनाच ।। २०।।

 

लेखक –
प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
राज्यस्तरीय आदर्श उपक्रमशील
शिक्षक पुरस्कार प्राप्त अभंगकार, अमरावती.
संपर्क – ८०८७७४८६०९

प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
Author: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले

लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, साहित्यिक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्ते असून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावरील बारा पुस्तकांचे लेखक असून बावीस पुरस्कारांचे मानकरी आहेत.

Leave a Comment