दि.२१ जून २०२६ रोजी असलेल्या “जागतिक बाप दिवस” (इंटरनॅशनल फादर डे) च्या निमित्त साहित्यिक, अभंगकार, कवी प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी स्वतःच्या शेतकरी बापावर केलेली कविता येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहेत.
“माझा शेतकरी बाप”
माझा शेतकरी बाप
बाबारावजी तयांचे नाव
त्यांच्या नावातच बाबा
तेच आम्हा भावंडांचे विठोबा
काळ्या आईच्या कुशीत
दिवस-रात्र घाम गाळती
स्वतः उपाशी राहून
आमच्या कुटुंबासोबतच
पूर्ण जगाचा पोशिंदा बनती.
माझा शेतकरी बाप
जगात सगळ्यात साजिरा!
साधे,भोळे पण कष्ठाळू
दोन मजुरांची मजुरी वाचावी
म्हणून स्वतःच दोन
मजुरांचे काम करणारे
माझे बाबा जगावेगळेच
आम्हा भावंडांना वाटायचे.
कष्ठ करणाऱ्या बाबांच्या
अंगात फाटकी बंडी
अन् डोक्यावर दुपट्टा,
हातात नेहमीच शेतीच्या
कामाची अवजारे.
तरीही चेहऱ्यावर
कधी न दाखवे,
कष्टाचे आणि गरिबीचे
चटके नि वारे
उन्हातान्हात राबताना
बापाची चामडी
पार करपून जाई
पण आम्हा लेकरांच्या
भविष्यासाठी
बाबांच्या डोळ्यात
स्वप्न नवं फुलत राही.
आम्हा बहीण भावंडांच्या
शिक्षणाची काळजी घेणारे
बाबा जणू काळजीवाहू सरकार
त्यात आई मैनाबाईची
नेहमीच होती कष्ठमय साथ
मातीमध्ये असलेले
द्वयांचेही कष्ठमय हात
सोन्यासारखे पीक
जेव्हा शेतीत उगवत असे
तेव्हा बा च्या चेहऱ्यावरील
आनंद घरभर आम्हा
भावंडांना पसरताना दिसे
तेव्हा आमचे घरही
आनंदात न्हाऊन निघे .
हा आनंद आमचा सर्वांचाच
झाला होता द्विगुणित
जेव्हा बाबा अचलपूर मधील
नशीबपुऱ्याचे नशीब
बदलविण्याकरिता
नगरसेवक म्हणून दोन वेळा
आले होते निवडून
आणि खरोखरच नशीबपुऱ्याचे
नशीब बाबांनी आपल्या
सत्कर्मातून बदलविले.
आणि माझे बाबा
आदर्श नगरसेवक म्हणून नावारूपास आले.
आज सहा दशकानंतरही
एक आदर्श नगरसेवक म्हणून
नशीबपुऱ्यातील नागरिक
बाबांचे स्मरण करतात
दुःखातही सतत सुख
शोधण्याचा प्रयत्न
करणाऱ्या माझ्या बाबांना
जागतिक बाप दिनी
विनम्र अभिवादन ॥
जागतिक बाप दिनाच्या
(फादर्स डे च्या ) दिवशी
बापाच्या या
कष्ठमय जीवनाला
माझा सलाम ॥
लेखक –
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले
राज्यस्तरीय समाजभूषण
पुरस्कार प्राप्त कवी, अमरावती.
संपर्क – ८०८७७४८६०९
Author: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, साहित्यिक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्ते असून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावरील बारा पुस्तकांचे लेखक असून बावीस पुरस्कारांचे मानकरी आहेत.





