दुष्काळातून पूराकडे – मराठवाड्याच्या भूगोलाची भीषण कथा…

SHARE:

मराठवाडा म्हटलं की डोळ्यासमोर दुष्काळग्रस्त प्रदेशाचं चित्र उभं राहतं. पाण्याच्या टंचाईसाठी प्रसिद्ध असलेला हा भाग गेल्या काही दिवसात वेगळ्या संकटाला सामोरं जात आहे. ते संकट म्हणजे अचानक आलेला पूरप्रलय. एरवी पिण्याच्या पाण्यासाठी तडफडणाऱ्या मराठवाड्यात आता काही तासांत गावं पाण्याखाली जाणं, शेतं वाहून जाणं आणि शेकडो लोक विस्थापित होणं ही दृश्यं दिसू लागली आहेत. हा विरोधाभास समजून घेण्यासाठी आपल्याला मराठवाड्याच्या भूगोलाचा आणि बदलत्या हवामानाचा अभ्यास करावा लागतो.

जमीन आणि माती –

मराठवाडा हा दख्खन पठाराचा भाग आहे. इथे छोट्या-छोट्या टेकड्या, डोंगररांगा आणि खोल दऱ्या आहेत. या भागातील प्रमुख नद्या मंजरा, तेरणा, पूर्णा, दूधना आहेत. यांचे खोरे तुलनेने अरुंद आहेत. पाऊस आला की या नद्यांमध्ये पाणी साचण्यापेक्षा वेगाने वाहून जातं. त्यामुळे अल्पावधीत पाण्याचा जोर वाढून गावांमध्ये पूर येतोय. मराठवाड्यातील काळी माती ही कापसासाठी योग्य मानली जाते, पण तिच्या भौतिक गुणधर्मांमुळे पूरस्थिती गंभीर होते. ही माती पाणी पटकन झिरपू देत नाही. मुसळधार पावसात ही माती चिखलट होऊन पाणी धरून ठेवते. परिणामी, पाणी साचतं आणि एका टप्प्यावर ते ओसंडून नद्या-नाल्यांकडे धाव घेतं. या अचानक धावलेल्या प्रवाहामुळे पूराची तीव्रता वाढते. तसेच गेल्या दशकभरात हवामान बदलामुळे पावसाच्या पद्धतीत मोठे बदल झाले आहेत. पूर्वी मराठवाड्यात पावसाळा ३-४ महिन्यांपर्यंत विभागून पडायचा. आता मात्र काही दिवसांतच महिनाभराचा पाऊस कोसळतो. ढगफुटी सारख्या घटना वाढल्या आहेत. जमीन आणि माती दीर्घकाळ कोरडी राहिल्यानंतर अचानक मुसळधार पाऊस झाला की ती पाणी शोषून घेऊ शकत नाही. यामुळे पाण्याचा मोठा भाग लगेच वाहून जातो आणि पूरस्थिती निर्माण होते. मराठवाड्यात अनेक मध्यम आणि लहान धरणं आहेत. अतिवृष्टीच्या काळात ही धरणं पटकन भरतात आणि मग विसर्ग करावा लागतो. हा विसर्ग एकाचवेळी झाल्यास खालच्या गावांमध्ये अचानक पूरस्थिती निर्माण होते. त्यातच नदीपात्रांवर झालेलं अतिक्रमण, बांधकामं आणि वाळूउचल यामुळे पाण्याला नैसर्गिक मार्ग मिळत नाही. परिणामी गावं आणि शेतं पाण्याखाली जातात.

मानवी हस्तक्षेप –

पूरामागे केवळ भूगोल आणि हवामान जबाबदार नाही, तर मानवी हस्तक्षेपही मोठा घटक आहे. शहरांमध्ये नाले आणि गटार यंत्रणा अपुरी आहे. पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी पुरेशी ड्रेनेज व्यवस्था नसल्याने काही तासांत संपूर्ण वस्ती पाण्यात बुडते. जंगलतोडीमुळे डोंगररांगांवर झाडी कमी झाली आहे. त्यामुळे पावसाचं पाणी अडून राहण्याऐवजी थेट गावाकडे धाव घेतं. पूरामुळे सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. कापूस, सोयाबीन, बाजरी यांसारखी पिकं पाण्याखाली जाऊन नष्ट होतात. आधीच कर्जबाजारी शेतकरी आणखी संकटात सापडतो. ग्रामीण भागात घरं, रस्ते, पूल वाहून जातात. शहरी भागात वाहतूक ठप्प होते, आजार पसरतात. स्थानिक प्रशासनासमोर तात्काळ मदत पोहोचवणं ही मोठी कसरत ठरते.

ठोस उपाय –

यावर उपाययोजना खरंतर झाल्या पाहिजे. कारण पूर टाळायचा असेल तर केवळ मदतपुरतं धोरण पुरेसं नाही. काही ठोस उपाय हवे आहेत. जसे की जलसंधारण प्रकल्प तयार करणे. छोटे बांध, शेततळं, पाणलोट विकास या योजना राबवल्या गेल्या पाहिजे. जंगल व झाडी यांचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे. डोंगररांगांवर वृक्षलागवड करून पाणी धरून ठेवता आलं तर उत्तम होईल. अर्ली वॉर्निंग सिस्टम तयार करावी लागेल. पाऊस मोजणारी आधुनिक साधनं, मोबाईल अलर्ट आणले पाहिजे. सोबतच नदीपात्र मोकळं करणं, धरण व्यवस्थापन करणे हे देखील आवश्यक आहे.

दुष्काळ आणि पूर –
मराठवाड्यात अचानक पूर येणं ही नैसर्गिक आपत्तीचं परिणाम आहे, पण त्यामागे मानवनिर्मित कारणंही तितकीच जबाबदार आहेत. दुष्काळ आणि पूर ही दोन टोकं या भागाच्या पाचव्या दशकापासून दिसत आली आहेत. आज गरज आहे ती विज्ञानाधारित धोरणांची, स्थानिक भूगोलाशी जुळवून घेतलेल्या उपाययोजनांची. मराठवाड्यातील पूर आपल्याला केवळ पावसाच्या बदललेल्या पद्धतीबद्दल सावध करत नाही, तर विकासाच्या नावाखाली निसर्गाशी केलेल्या तडजोडीबद्दलही प्रश्न विचारतो. दुष्काळासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाला आता पूराची ओळख मिळणं हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे.

तेजस्वी बारब्दे पाटील
Author: तेजस्वी बारब्दे पाटील

लेखिका अमरावती येथील रहिवासी असून सामाजिक व राजकीय कार्यकर्त्या तथा विश्लेषक आहेत. एक स्तंभलेखक म्हणून त्यांनी स्वतः ची नवीन ओडख निर्माण केली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा