पळसखेड ग्रामपंचायत मध्ये स्वातंत्र्यदिनी तणावपूर्ण वातावरण; ग्रामसभा न घेतल्याचा ग्रामस्थांचा आरोप..

SHARE:

अमरावती – जिल्ह्यातील पळसखेड येथे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी नियोजित ग्रामसभा न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा घेण्याची परंपरा असताना यंदा ग्रामसभा आयोजित करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात एकत्र येत आक्रमक भूमिका घेतली. ग्रामसभा होणार असल्याने अनेक नागरिक सकाळपासून ग्रामपंचायत कार्यालय परिसरात उपस्थित झाले होते. मात्र, ग्रामसेवक तसेच सरपंच यांच्यापैकी कोणीही उपस्थित न राहिल्याने ग्रामस्थांचा संताप वाढला. अखेर नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकत निषेध नोंदविला. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयातील टेबल-खुर्च्याही बाहेर काढण्यात आल्या. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेण्यात आलेली नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामसभेच्या माध्यमातून गावातील विकासकामे, निधीचा वापर, विविध योजनांची अंमलबजावणी आणि ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत नागरिकांना माहिती मिळणे अपेक्षित असते. मात्र, ग्रामसभा न घेतल्याने गावकऱ्यांना प्रश्न विचारण्याची आणि ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा हिशोब मागण्याची संधी मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारात अनेक गैरप्रकार व भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. या आरोपांबाबत ग्रामसेवकांकडून ग्रामसभेत खुलासा होणे आवश्यक असताना ग्रामसभा घेतली जात नसल्याचा दावा नागरिकांनी केला.

त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, ग्रामसभा न घेतल्याच्या मुद्द्यावरून ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनामुळे पळसखेडमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये असलेला रोष या आंदोलनातून स्पष्टपणे समोर आला आहे.

तन्मय गणेश पुनसे
Author: तन्मय गणेश पुनसे

लेखक एक उत्कृष्ट व्याख्याते, लेखक, विद्रोहीकवी, स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विद्यार्थी असून अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील पळसखेड या गावी ते राहतात. अंधश्रद्धा, समाजकारण, अर्थकारण, राजकारण, भयकथा, शेतकऱ्यांच्या व्यथा इत्यादी विषयांवर लिहिण्यात त्यांना विशेष रस आहे. जेष्ट साहित्यिक प्रा. हरी नरके कथा पुरस्कार 2024 व अमरावती जिल्ह्याचा कविवर्य नारायण सुर्वे काव्यलेखन पुरस्कार 2026 ने ते सन्मानित आहे. मागील गेल्या वर्षभरापासून विविध समाज माध्यमांद्वारे आपले लिखाण करून आपले विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करत आहेत.

Leave a Comment