निसर्गाची किमया, मुसळधार पाणी आणि त्यामुळे शेतकऱ्याची झालेली व्यथा व उदासीन शासन या विषयावर प्रकाश टाकणारी विद्रोही कवी तन्मय गणेश पुणसे यांची ही कविता वाचकांसाठी येथे प्रकाशित करत आहोत…
संध्याकायच्या पायरी..
बापा लय इपरीत घळलं,
मुसयधार पाणी राज्या
आमच्या गावात पळलं.
ठोका मागं ठोक राज्या
पाणी पळलं लय जबर,
अइन माह्याच घरापुळे
थाबलं टोंगायाभर डबर.
घरातल्या घरात राज्या
ईकळून तिकळे जावो,
बुढाबुढीच्या चोरुन मी
दाठठ्यात उभा रावो.
जोऱ्यानं गरजे अभाय
चम चम चमकत ईजा,
माह्यी बायको मले म्हणे
घरात मुकाट्यानं निजा.
सकावुन गेलो वावरात
मी पावो चावर बावर,
वयखु नाई आलं मले
नाला हाये का ? वावर.
पिक पावुन मले राज्या
घ्या वाटे वावरात लोयन,
डोक्शाइतकं फुटुन गेलं
बांधावरलं मातीचं वयन.
वावरातली माती राज्या
पिकासईत खळ्ळुन गेली,
तहसीलदार साहेबाले म्या
लेखी तक्रार लीवून देली.
पिकाचं नुकसान पावुन
माह्ये हातपायचं गयले,
पटवारी मले म्हणे आमी
पिकाचा सर्वे करतो पयले.
माह्य आंग कापे थरथर
मले जोऱ्यानं वाजे हिव,
शेतकऱ्याच्या नुकसानाची
नेता पुढाऱ्याले नाई किव.
हेक्टरी हजाराची मदत
जमा व्हईल पुस्तकात,
तईपायातली आग माह्या
एकदम गेली मस्तकात.
हजार रुपायात कसतरी
आपलं च्यापाणी भागते,
बॅकेत गेलो पैश्याले पण
के वाय सी करा लागते.
माह्या आबा म्हणे नाता
असं अजुन नाई घळलं,
मुसयधार पाणी राज्या
आमच्या गावात पळलं.
लेखक –
तन्मय गणेश पुनसे
मु.पो. पळसखेड, जि. अमरावती
संपर्क – ७४९८९०८२३६
Author: तन्मय गणेश पुनसे
लेखक एक उत्कृष्ट व्याख्याते, लेखक, विद्रोहीकवी, स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विद्यार्थी असून अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील पळसखेड या गावी ते राहतात. अंधश्रद्धा, समाजकारण, अर्थकारण, राजकारण, भयकथा, शेतकऱ्यांच्या व्यथा इत्यादी विषयांवर लिहिण्यात त्यांना विशेष रस आहे. जेष्ट साहित्यिक प्रा. हरी नरके कथा पुरस्कार 2024 व अमरावती जिल्ह्याचा कविवर्य नारायण सुर्वे काव्यलेखन पुरस्कार 2026 ने ते सन्मानित आहे. मागील गेल्या वर्षभरापासून विविध समाज माध्यमांद्वारे आपले लिखाण करून आपले विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करत आहेत.






