नागपूरच्या चित्रकला स्पर्धेत कुमारी आराध्या मांडवकर हिचा प्रथम क्रमांक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः केले सन्मानित…

SHARE:

नागपूर : नागपूर येथील सुरेश भट सभागृहात गुरुवार, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘मंथन युवा – यूथ आयकॉन पेंटिंग कॉम्पिटिशन’ या चित्रकला स्पर्धेत नागपूर जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धेत जीवन विकास वनिता विद्यालयाची इयत्ता ८ वीतील विद्यार्थिनी कु. आराध्या चंद्रशेखर मांडवकर हिने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.

आराध्याने स्पर्धेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आकर्षक व प्रभावी व्यक्तिचित्र रेखाटले. तिच्या कलाकृतीचे परीक्षण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. आराध्याच्या उत्कृष्ट चित्रकलेचे कौतुक करत तिला रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित पारितोषिक वितरण समारंभात प्रथम क्रमांकाचे ₹१५,००० रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.

या पारितोषिक वितरण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आराध्याचा गौरव करण्यात आला. तिच्या या यशामुळे जीवन विकास वनिता विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

आराध्याला चित्रकला शिक्षक हेमंत चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच जीवन विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, सचिव व सर्व पदाधिकारी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली चौधरी, पर्यवेक्षक श्री. नंदनवार तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आराध्याला प्रोत्साहन व सहकार्य केले.

आराध्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जीवन विकास शिक्षण मंडळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तिच्या यशामुळे विद्यालयातील विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, आराध्याने आपल्या कलागुणांच्या जोरावर विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.

इंजि. प्रदीप चौधरी
Author: इंजि. प्रदीप चौधरी

लेखक नागपूर येथील रहिवासी असून अमरावती येथील कृषिदेव खत कारखान्यात कारखाना व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. पेशाने ते यांत्रिकी अभियंता आहे, त्याचबरोबर समाजातील आरोग्य आणि फिटनेस जनजागृतीसाठी ते हेल्थ अँड लाइफ कोच म्हणूनही कार्यरत असून समाजप्रबोधनाचे कार्य सक्रियपणे करतात. साहित्याची आवड असल्यामुळे ते सामाजिक, शैक्षणिक तसेच आरोग्य व जीवनशैली विषयक लेखन नियमितपणे करतात. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक विषयांवर विपुल लेखन केले असून त्यांचे लेख सोशल मीडिया मध्ये सातत्याने प्रकाशित होतात. विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ते समाजप्रबोधनाचे कार्य प्रभावीपणे पार पाडत आहेत. आपल्या प्रभावी आणि विचारप्रवर्तक लेखणीद्वारे ते सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक विषयांवरील महत्त्वपूर्ण विचार जनतेसमोर मांडतात. आपले विचार सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून ते नेहमी प्रखरतेने मांडत असतात.

Leave a Comment