अमरावती : जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अल्प पावसामुळे विहिरी, कूपनलिका आणि स्थानिक जलस्रोतांची भूजलपातळी खालावली असून, उपलब्ध पाण्यावर पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांना सातत्यपूर्ण सिंचनाची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दररोज १२ तास वीजपुरवठा करण्याच्या शासनाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आशिष येरेकर यांनी संबंधित यंत्रणांना निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यातील अनेक भागांत कृषी फिडरवर वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, अनियमित भारनियमन, कमी दाबाने वीजपुरवठा होणे तसेच ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर वेळेत न बदलणे, अशा तक्रारी शेतकरी व लोकप्रतिनिधींकडून प्राप्त होत आहेत. दुष्काळाच्या परिस्थितीत पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाच्या १२ तास वीजपुरवठ्याच्या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रत्येक महसुली गावात ग्रामस्तरीय वीज तपासणी पथक स्थापन करण्यात येणार आहे. या पथकात तलाठी, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, गावातील प्रगतिशील शेतकरी तसेच महावितरणचा तांत्रिक कर्मचारी यांचा समावेश असेल. या पथकाने गावातील कृषी फिडरवरून शेतकऱ्यांना नियमानुसार दररोज १२ तास वीजपुरवठा होतो की नाही, याची नियमित नोंद ठेवायची आहे.
वीजपुरवठा वारंवार खंडित होणे, कमी दाबाने वीज मिळणे किंवा ट्रिपिंगच्या समस्या उद्भवल्यास शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीची पाहणी करण्यात येईल. गावातील वीजपुरवठ्याची वेळ, वीज सुरू व बंद होण्याची वेळ आणि तक्रारींची नोंद ठेवण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात स्वतंत्र वीज नोंदवही ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तालुकास्तरावर तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता किंवा सहाय्यक अभियंता, तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचा समावेश असेल. तहसीलदारांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत दर सोमवारी आढावा बैठक घेऊन वीजपुरवठ्याच्या परिस्थितीचा आढावा घ्यावा. ग्रामस्तरीय पथकांकडून प्राप्त झालेल्या वीज खंडित होण्याच्या किंवा कमी दाबाच्या तक्रारींवर महावितरणने २४ तासांच्या आत तांत्रिक दुरुस्ती करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यास तातडीने दुरुस्ती
गावातील कृषी ट्रान्सफॉर्मर जळाल्यास किंवा नादुरुस्त झाल्यास महावितरणकडे तातडीने तक्रार नोंदवावी. नियमानुसार २४ ते ४८ तासांच्या आत नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे किंवा आवश्यक दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. वीजपुरवठ्यात जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करणाऱ्या किंवा शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ग्रामस्तरीय पथकांनी दर शनिवारी वस्तुस्थितीदर्शक साप्ताहिक अहवाल तहसीलदारांकडे सादर करावा. तहसीलदारांनी संकलित अहवाल दर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विहित नमुन्यात पाठवावा, असे आदेशात नमूद आहे.
जिल्ह्यात दुष्काळ व आपत्तीसदृश परिस्थिती लागू असल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ मधील संबंधित तरतुदी लागू आहेत. शेतकऱ्यांना आवश्यक वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या कामात हलगर्जीपणा किंवा कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार शिस्तभंगाची तसेच कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असे आदेशात सांगण्यात आले आहे.
Author: आकाश रमेशराव दानखडे
लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. २०२६ साली महाराष्ट्र शासनाने त्यांना "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून सन्मानित केले आहे.






