नागपर : राज्य सरकारने जाहीर केलेली ५,००० रुपयांची तुटपुंजी मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याचा आरोप करत, आज नागपुरात “भीक मांगो आंदोलन” करण्यात आले. विदर्भ राज्य आंदोलन समिती (विराआंस) आणि शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी दुपारी १२ वाजता तहसील कार्यालयाशेजारी, प्रोव्हिडन्स स्कूल जवळ (नागपूर) या आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या आंदोलनाला नागपूर शहर व जिल्ह्यातील शेतकरी, पदाधिकारी आणि विदर्भप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तीव्र निषेध नोंदवला.


सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
आंदोलनाची सुरुवात प्रोव्हिडन्स स्कूल जवळून होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी ५,००० रुपयांची मदत म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, असा संतप्त सूर आंदोलकांमध्ये उमटला.


जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला पाठवली भिक्षेची रक्कम
आंदोलनकर्त्यांनी निषेधाचे अनोखे प्रतीक म्हणून आंदोलनादरम्यान जमा झालेली रक्कम जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठवली. “सरकारने दिलेली ही मदत शेतकऱ्यांचा अवमान करणारी असून, शेतकऱ्यांना भीक मागण्याची वेळ आणणाऱ्या या असंवेदनशील सरकारला या रकमेतून त्यांची औकात दाखवून दिली आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी नेत्यांनी दिली.


प्रमुख नेत्यांची आक्रमक उपस्थिती
या आंदोलनाचे नेतृत्व अरुणभाऊ केदार (उपाध्यक्ष – विराआंस, माजी जिल्हाध्यक्ष – शेतकरी संघटना), श्रीकांत दौलतकार (जिल्हाध्यक्ष नागपूर शेतकरी संघटना), प्रशांत नखाते (जिल्हाध्यक्ष नागपूर विराआंस), संजय चौधरी (जिल्हाध्यक्ष युवा आघाडी) आणि पूर्व नागपूर अध्यक्ष तारेश गजानन दुरुगकर यांनी केले.
सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे बंद करून तातडीने सन्मानजनक आणि भरीव मदत जाहीर करावी, अन्यथा आगामी काळात आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.






