जे का रंजले गांजले l त्यासी म्हणे जो आपुले ll

SHARE:

तुका म्हणे, शोभा सांगे…

संत तुकाराम महाराज म्हणतात की, जे दुःखाने रंजले – गांजलेले लोक आहेत त्यांना जो आपले म्हणतो, तोच साधू आहेस ओळखावे व देव तेथेच आहे असे जाणावे. या अभंगातून तुकाराम महाराजांनी सज्जन माणसाची लक्षणे सांगितली आहेत.

मृदु सबाह्य नवनीत l तैसे सज्जनांचे चित्त ll
ज्यासी अपंगिता नाही l त्यासी धरी जो हृदयी ll 
दया करणे जे पुत्रांसी l तेची दासा आणि दासी ll

ज्याप्रमाणे लोणी अंतर्बाह्य मृदु असते, त्याप्रमाणे सज्जनांचे चित्त असते. ज्यास कोणाचा आधार नाही, अशाला जो हृदयाशी धरतो, पुत्राच्या ठिकाणी जशी दया करतो, तशीच दया दासदासींवर ही करतो. तुकाराम अशा सज्जनांना भगवंताच्या मूर्तीच मानतात.

सदर अभंग म्हणजे तुकाराम महाराजांच्या अमर ओळी म्हणजेचं अमर साहित्यातील अमर काव्य आहे.. या अमर  ओळींना धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक असा शाश्वत  अर्थ आहे.

आध्यात्मिक अर्थ –

खरा साधू हा जंगलात नाही,तर दुखी माणसाच्या अश्रुत सापडतो. तुकाराम सांगतात, देव मूर्तीत नसून देव माणसात आहे. रंजल्या गांजल्याची सेवा, हीच खरी सेवा ईश्वर सेवा आहे. आपला परक भेद मिटला की माणूस देव बनतो. दुखितांची  सेवा केल्याने अहंकार गळून पडतो. तुकारामांच्या मते हेच खरे अध्यात्म आहे. दुसऱ्याचे दुःख आपले मानल्याने आत्म्याची शुद्धता होते. परमेश्वराला शोधायला तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही. परमेश्वर उपाशी, आजारी, अनाथ माणसाच्या रूपात दारात उभा असतो. संत तुकारामांच्या अभंगातून हेच सिद्ध होते की करूणा हीच खरी भक्ती आहे. जिथे करूणा आहे तिथेच देव आहे. “मी” पणा  सोडून “तू” पणात जगणे म्हणजे अध्यात्म. जो रंजल्या गांजल्यांचे दुःख स्वतःचे समजतो. त्याचा अहंकार गळून पडतो. तिथेच त्याला आत्मा आणि परमात्मा एक असल्याचा साक्षात्कार होतो. तोच खरा साधू समजावा. इतके मोठे अध्यात्म संत तुकारामांच्या ह्या सुभाषित स्वरूपात अडलेल्या अभंगाच्या ओळीत आहे.

सामाजिक अर्थ –

समाजात सुखी आणि दुःखी असे दोन गट असतात. सुखी माणसाने दुःखी माणसाला आपलं म्हणणं, हाच खरा सामाजिक न्याय आहे. जात, धर्म, पैसे, पद हा भेद विसरून मदत करता आली पाहिजे. आज आपल्या मोबाईल वर हजारो मित्र आहेत पण शेजाऱ्याच्या दुःखात कोणी धावून जात नाही. संत तुकाराम महाराज हीच सामाजिक दरी मिटवायला सांगतात. रंजल्या गाजल्याना आधार देणे हीच खरी समाजसेवा आहे.

धार्मिक अर्थ –

देव फक्त मंदिरात, पूजेत, माळा जपण्यात नाही, जो माणूस दुसऱ्या दुखी माणसात देव पाहतो आणि त्याची सेवा करतो तीथेच खरं धर्म आहे. कर्म कांडा पेक्षा माणुसकी हाच मोठा धर्म आहे. म्हणूनच तुकाराम म्हणतात, साधू ओळखायचा असेल तर त्याच्या दयेत शोधा. थोडक्यात देव शोधायला हिमालयात जायची गरज नाही. रंजल्या गांजल्याची सेवेत गरिबाच्या झोपडीत, अनाथांचा कारुण्यपूर्ण डोळ्यात देव आहे. त्याला आपलं जे म्हणेल तोच खरा साधू आहे. हाच धर्म आहे, हाच मोक्ष आहे.

 

लेखिका –
डॉ. शोभा माधव गायकवाड 
ग्रामगीताचार्य, संत साहित्याचे अभ्यासक,
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित, अमरावती.

डॉ. शोभा माधव गायकवाड
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड

लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा