पुणे/नागपूर : पुणे शहरात एका आरोपीला दोरीने बांधून, भररस्त्यात परेड काढून केलेल्या अमानुष व बेकायदेशीर गैरवर्तणूक प्रकरणी अखेर पुणे पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे. या गंभीर मानवाधिकार उल्लंघनाविरुद्ध नागपूर येथील विधिज्ञ ॲड. अरशद खान यांनी केलेल्या कायदेशीर तक्रारीची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह एकूण १० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे.
नेमके काय होते प्रकरण?
पुण्यातील लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आरोपी सुलतान शेख याला बेकायदेशीरपणे दोरीने बांधून आणि हातकड्या घालून रस्त्यावरून फिरवत सार्वजनिक अपमान व अमानुष वागणूक देण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला होता. “केवळ आरोपी असल्यामुळे कोणाचेही मूलभूत मानवी हक्क संपत नाहीत आणि आरोपीची अशी सार्वजनिक परेड काढणे थेट सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आहे,” अशी ठाम भूमिका घेत ॲड. अरशद खान यांनी पुणे पोलीस आयुक्त तसेच महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे रीतसर तक्रार दाखल केली होती.
चौकशीअंती सुनावलेली शिक्षा : अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) यांच्यामार्फत झालेल्या चौकशीनंतर, पोलीस उप-आयुक्त कार्यालय, परिमंडळ-४ (येरवडा) यांनी अधिकृत पत्राद्वारे शिक्षेचा तपशील दिला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम (लक्ष्मीनगर पो. स्टे.) यांची देय वार्षिक वेतनवाढ (Increment) पुढील वेतनवाढीवर परिणाम होणार नाही अशा रीतीने रोखण्याची शिक्षा पोलीस आयुक्तांमार्फत देण्यात आली आहे. ९ पोलीस अधिकारी व अंमलदार सपोनि शिवाजी विभुते, सपोनि रविकांत नंदनवार, पोउपनि महेश मलावडे तसेच पोलीस शिपाई गायकवाड, वायाळ, कांबळे, शिंदे, शेख आणि ओंबासे या नऊ जणांना प्रत्येकी ₹१,००० /- दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
लढा अजून संपलेला नाही : ॲड. अरशद खान
या कारवाईबाबत बोलताना ॲड. अर्शद खान म्हणाले, “पोलिसांना कायद्यानुसार तपास करण्याचा पूर्ण अधिकार आहे, मात्र स्वतः कायदा हातात घेऊन आरोपींची रस्त्यावर धिंड काढणे कायद्याच्या चौकटीत बसत नाही. प्रशासनाने अंतर्गत कारवाई केली असली, तरी हा लढा इथेच संपलेला नाही. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगासमोर (MSHRC) या प्रकरणाची कायदेशीर लढाई सुरूच असून, मानवी हक्कांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य व कठोर कायदेशीर जबाबदारी निश्चित होईपर्यंत आमचा पाठपुरावा सुरू राहील.”
Author: विवेक गंगाधरराव राऊत
लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.






