नागपूर : ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने महत्त्वपूर्ण प्रगती साधली आहे. जिल्ह्यातील एकूण ८२ आरोग्य संस्थांनी राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (NQAS) प्राप्त केले आहे. यामध्ये ७४ आरोग्य उपकेंद्रे, ७ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे.

केवळ मानांकन नव्हे, तर गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेची बांधिलकी!
NQAS मानांकन हे आरोग्य संस्थांमधील सेवा गुणवत्ता, स्वच्छता, संसर्ग प्रतिबंध, रुग्णांची सुरक्षितता, औषधोपचारांची उपलब्धता, निर्धारित कार्यपद्धतींचे पालन आणि रुग्णांच्या हक्कांचे संरक्षण यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींचे मूल्यांकन करणारी प्रक्रिया आहे. या उपक्रमामुळे आरोग्य संस्थांमध्ये गुणवत्ता मानकांचे पालन, नियमित मूल्यमापन, कामकाजातील शिस्त आणि सेवांमध्ये सातत्यपूर्ण सुधारणा करण्यास चालना मिळते.

सुशासन, नियोजन आणि सांघिक प्रयत्नांचे फलित
या प्रगतीमागे नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनायक महामुनी (भा.प्र.से.) यांचे मार्गदर्शन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी (DRCHO) डॉ. रेवती साबळे, सर्व तालुका आरोग्य अधिकारी (THO), तसेच NQAS पथकाचे समन्वित प्रयत्न महत्त्वाचे आहेत. जिल्हा मुख्यालय स्तरावर डॉ. प्रशांत कापसे यांच्या नेतृत्वाखाली NQAS संबंधित कामकाजाचे समन्वयन, तांत्रिक मार्गदर्शन, गुणवत्ता मानकांची पूर्तता आणि पाठपुरावा करण्यात पथकाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. नियोजनबद्ध अंमलबजावणी, नियमित आढावा, क्षेत्रीय स्तरावरील समन्वय आणि गुणवत्ता सुधारण्यावर सातत्यपूर्ण भर यांमुळे या उपक्रमाला गती मिळाली आहे.

सुशासन म्हणजे नागरिकांना मिळणाऱ्या सेवेच्या गुणवत्तेत सुधारणा!
सुशासनाचे खरे मोजमाप केवळ योजनांची संख्या किंवा मानांकनांमध्ये नसून, त्यातून सामान्य नागरिकांना मिळणाऱ्या लाभात असते. ग्रामीण नागरिकांना आपल्या गावाजवळच सुरक्षित, विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळावी, हा या प्रयत्नांचा मुख्य उद्देश आहे. NQAS मानांकन मिळविण्याबरोबरच निर्धारित गुणवत्ता मानके सातत्याने टिकवून ठेवणे आणि आरोग्यसेवेचा प्रत्यक्ष अनुभव अधिक चांगला करणे, ही नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची पुढील वाटचाल असेल.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.






