सुख पाहता जवापाडे l दुःख पर्वता एवढे ll

SHARE:

तुका म्हणे, शोभा सांगे…

संत तुकारामांनी अत्यंत कमी पण तितक्याच सुंदर शब्दात सुख दुःखाचे वर्णन केले आहे. कारण तो त्यांचा स्वानुभव आहे. आपल्याला असं वाटतं की संसारात खुप सुख आहे. पण तुकोबा म्हणतात की, नीट पाहिलं तर सुख हे जवाच्या दाण्याएवढे – अगदी छोटे आहे. क्षणिक आहे. आणि दुःख ते पर्वता एवढे मोठे, व्यापक आहे. आपण छोट्या सुखामागे धावताना मोठ्या दुःखाला कायम कवटाळत असतो. मानवी मनाची रचनाच अशी आहे की थोडेसे सुख मिळाले तरी आपण ते मोठे करून पाहतो. आणि दुःख आले की ते आपल्याला पर्वतासारखे वाटते. हाच मोह आणि आसक्ती  आपल्याला भगवंतापासून दूर नेतो. “दुःख बांदवडी आहे हा संसार” अशी त्यांनी आपल्या मनाशी खुणगाठ बांधलेली आहे. संत तुकारामांनी सांगितलेल्या विचारांमध्ये अतिशय गहन अर्थ भरलेला आहे.

भुकेने व्याकुळ होऊन ज्यावेळी तुकारामांच्या पत्नीने आणि पुत्राने प्राण सोडला. त्यावेळी काळाच्या तडाख्यातून त्यांना आपल्या प्रिय पत्नी व मुलास वाचविता आले नाही. अशावेळी त्यांच्या मनात विचार आला की “माझे माझे म्हणून आपण जे मानीत होतो आणि मिरवीत होतो, त्यापैकी आज आपल्यापाशी काय राहिले?” या आलेल्या अनुभवातून त्यांनी सिद्धांत मांडला की, 

“देह हे देवाचे, धन कुबेराचे l तेथे मनुष्याचे काय आहे ll
निमित्ताचा धनी केला असे प्राणी l माझे माझे म्हणोनी व्यर्थ गेला ll” 

मनुष्याला प्राप्त झालेला नरदेह हा देवाचे धन आहे. आपण केवळ निमित्त मात्र आहोत. विश्वाचे नियमन करणारे परमोच्च तत्व खरोखरीच गूढ व अतर्क्य आहे. आपण केवळ निमित्त मात्र आहोत. मग माणसाने फुकाचा अहंकार कशाला करावा?  हेच नियतीचे तत्व आहे आणि ते तुकारामांनी नीट समजावून घेतले. तुकारामांच्या आयुष्यात एकामागून एक आपत्ती आल्या. प्रत्येक विनाशकारी विपत्तीत तुकाराम अतिशय संयमाने व प्रामाणिक पणे वागले.

आपत्ती आणि दुःख हे मिळूनच येतात. त्याशिवाय त्यांच्या आयुष्यात आलेली तिसरी गोष्ट म्हणजे दुर्लौकिक. दुःखात एक तर लोकांनी मदत करण्या ऐवजी त्यांची खिल्ली उडवून छी थु केली. मनुष्याचे कर्म आणि त्याचा परिपाक यांच्या परस्पर संबंधात अदृश्य शक्तीचे वर्चस्व असते. म्हणूनच “प्रारब्धे चि जोडे धन l प्रारब्धेचि वाढे मान ll” असे मानल्याखेरीज गत्यंतर नाही. अशा प्रकारचे अनेक विचार तुकारामांच्या मनात येत असत.

आर्थिक विपत्तीच्या काळात आप्त स्वकीयांच्या सदिच्छा आणि स्नेह संबंध खूप उथळ आणि दिखाऊ असतात याची तुकारामांना स्पष्ट कल्पना आली.

“सोयरे धायरे दिल्या घेतल्याचे l अंत हे काळीचे नाही कोणी ll
सख्ख्या गोत्र बहिणी, सुखाचे संगती l गोकलुनी देती अंतकाळी ll
आपुले शरीर आपणा पारीखे l परावी होतील नवल काई ll
तुका म्हणे आता सोड यांची आस l धरी रे या कास पांडुरंगा ll”

दुष्काळा नंतर तुकारामांना सर्व व्यवहारात अपयश येऊ लागले. आर्थिक दृष्ट्या दिवाळे निघाले. या बिकट प्रसंगी त्यांना लोकांचे निरनिराळे अनुभव येऊ लागले. आपत्ती काळात नातेवाईक उपयोगी पडत नाहीत. सगे सोयरे आप्तस्वकीय, बंधू भगिनी हे सारे फक्त सुखाचेच सोबती असतात. जेथे स्वतःचेच शरीर म्हातारपणी साथ देत नाही. तेथे आप्त स्वकीय तर परकेच आहेत, ते साथ देत नाहीत यात नवल ते काय.? 

तुकोबांना या संकटकाळाच्या प्रसंगात आप्त स्वकीयांची, सोयरे धायऱ्यांची आस सोडून पांडुरंगाच्या आश्रयाला जावे असे मनापासून वाटत असे. सर्व नाते संबंध दिल्या घेतल्याचे असतात ह्या विदारक सत्याची जाणीव तुकोबाना झाली.

“आध्यात्मिक बोध” – 

तुकाराम महाराज फार मोठा बोध यातून देतात. जो पर्यंत आपण या जवा एवढ्या सुखासाठी धावतो. तोपर्यंत पर्वताएवढे दुःख भोगावे लागते. खर आणि शाश्वत असे टिकणारे अखंड सुख फक्त पांडुरंगाच्या नामस्मरणात आहे. भक्तीत आहे. संसारातील सुख नाशिवंत आहे. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की, या छोट्या सुखाच्या मागे न लागता त्या विठ्ठलाला शरण जा, जिथे दुःखाचा लवलेश ही नाही. थोडक्यात म्हणजे संसारात सुखाचा भास जास्त होत असला तरी दुःखच जास्त आहे. म्हणून भगवंताकडे वळावे.

 

लेखिका –
डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
संत साहित्याचे अभ्यासक, अमरावती.

डॉ. शोभा माधव गायकवाड
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड

लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा