नागपूर : नागपूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट भारतीय चलनी नोटा तयार करून त्या चलनात आणण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
घटनेची पार्श्वभूमी : फिर्यादी रमेश गंगाधर हरडे (वय ५५, रा. मानेवाडा-बेसा रोड) यांनी वाठोडा येथील त्यांच्या मालकीची खोली पुष्पम कृष्णा बंडाने (वय २९) यास भाड्याने दिली होती. भाडेकरूने दोन महिन्यांपासून भाडे न दिल्याने आणि संपर्क न झाल्याने २४ ऑक्टोबर २०२६ रोजी फिर्यादी वरील मजल्यावर गेले. मुख्य प्रवेशद्वाराला प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी दुसऱ्या मास्टर चावीने दार उघडून पाहिले असता, हॉलमधील सोफ्यावर ५०० रुपयांच्या नोटांसारख्या दिसणाऱ्या नोटा अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल : पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, ५०० रुपये दराच्या मूळ चलनानुसार ३७,००,००० रुपयांच्या नोटासदृश्य कागद, तसेच एका बाजूला मजकूर व चिन्हे आणि दुसरी बाजू कोरी असलेले ४८,००,००० रुपयांचे कागद आढळले. याशिवाय एक लॅपटॉप, कलर प्रिंटर, पेपर कटर, वेगवेगळ्या रंगांच्या शाईच्या बॉटल्स व इतर साहित्य असा एकूण ३७,८३,६00 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल व अटक : पोलिसांनी आरोपी पुष्पम कृष्णा बंडाने याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १७८, १८०, १८१ नुसार गुन्हा नोंदवून त्यास अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.






