नागपूर सायबर पोलिसांची धडक कारवाई : ४.४५ कोटींच्या ऑनलाईन फसवणुकीतील १२ आरोपींना अटक, म्युल अकाउंट रॅकेटचा पर्दाफाश

SHARE:

नागपूर : नागपूर सायबर पोलीस ठाण्याने ऑनलाईन आर्थिक फसवणूक करणाऱ्या भामट्यांविरोधात मोठी मोहीम उघडली असून, विविध गुन्ह्यांचा यशस्वी तपास करत आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलीस ठाणे सायबर पथकाने केलेल्या अत्यंत उत्कृष्ट कामगिरीमुळे कोट्यवधी रुपयांचा ऐवज गोठवण्यात व पीडितांना परत मिळवून देण्यात मोठे यश आले आहे. विविध गुन्ह्यातील फिर्यादीला रक्कम परत मिळवून देण्यात यश मिळाले. पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी माहिती दिली.

केसर इंडिया लिमिटेडच्या संचालकांच्या फोटो चा वापर करून ४.४५ कोटींची फसवणूक, १२ आरोपींना अटक 

नागपूरमधील सदर परिसरातील नामांकित ‘केसर इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या लेखापालाचा (अकाऊंटंट) मोबाईल अज्ञात आरोपीने हॅक केला. आरोपीने कंपनीच्या डायरेक्टर्सचा फोटो (DP) असलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावरून मेसेज पाठवून कंपनीच्या बँक बॅलन्सची माहिती घेतली आणि मुंबईतील एका बँक खात्यावर ४.४५ कोटी रुपये तात्काळ पाठवण्यास सांगितले.

मालकाचाच मॅसेज समजून फिर्यादीने RTGS द्वारे ४.४५ कोटी रुपये पाठवले. नंतर डायरेक्टरशी संपर्क साधल्यावर फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. सायबर पोलिसांनी याप्रकरणी अप. क्र. १२/२०२५ (कलम ३१८(४), ३१९(२), ३३६(२), ३३६(३), ३४०(२), ३(५) भा.न्या.सं. सहकलम ६६(C)(D) IT Act) अन्वये गुन्हा नोंदवून तपास चक्रे फिरवली. या गुन्ह्यात पोलिसांनी एकूण १२ आरोपींना अटक केली असून, फसवणूक झालेल्या रकमेपैकी ८० लाख रुपये फिर्यादीस परत मिळवून दिले आहेत. पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध मा. न्यायालयात दोषारोपपत्र (Charge-sheet) सादर केले आहे.

व्हॉट्सॲप हॅकिंगद्वारे १.३० कोटींचा गंडा; पोलिसांच्या तत्परतेने संपूर्ण रक्कम लिन (फ्रीझ)

दुसऱ्या एका घटनेत, अमित प्रदीप घाटे यांच्या व्हॉट्सॲप मोबाईल क्रमांकावर मालकाच्या फोटोचा मेसेज आला. मालकानेच पैसे पाठवण्यास सांगितले असे समजून घाटे यांनी १,३०,००,००० रुपये (एक कोटी तीस लाख) RTGS द्वारे आरोपीने दिलेल्या बँक खात्यात वळते केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तात्काळ तक्रार नोंदवण्यात आली.

सायबर पोलिसांनी अप. क्र. १४७/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करून तात्काळ हाय-अलर्ट कारवाई केली. पोलिसांच्या या जलद हालचालींमुळे फिर्यादीची संपूर्ण १ कोटी ३० लाखांची रक्कम संबंधित बँकेच्या खात्यात ‘लीन’ (गोठवून) ठेवण्यात यश आले. ही रक्कम न्यायालयीन प्रक्रियेनंतर फिर्यादीस परत मिळणार आहे.
१०३ कोटींच्या ‘म्युल बँक खात्यां’च्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश; ११ जण जेरबंद
सायबर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सायबर फसवणुकीसाठी वापरण्यात येणारे बनावट/म्युल बँक खाते (Mule Bank Accounts) उघडणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. अप. क्र. १०३/२०२६ अन्वये दाखल गुन्ह्यात ११ आरोपींना अटक करण्यात आली.

तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, या आरोपींनी महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील एकूण ३८८ तक्रारींमधून सायबर गुन्हेगारांनी उकळलेली १०३,१३,९४,४५८ रुपये (१०३ कोटींहून अधिक) रक्कम संगनमताने स्वीकारली व ती पुढे विविध बँक खात्यांवर वळवून तिची विल्हेवाट लावली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

MRM व GRM प्रणालीद्वारे लाखो रुपयांची वसुली व नागरिकांना दिलासा

नागपूर सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार :

MRM प्रणाली : आजवर एकूण १०,७७४ विनंत्या प्राप्त झाल्या. त्यापैकी ७,०२८ अर्जांवर जलद कारवाई करून ३,२०,६८,१३२ रुपये रिस्टोअर (Restore) करण्यात आले. यातील १,७५,०३,७१५ रुपये पीडितांना प्रत्यक्ष परत करण्यात आले असून, उर्वरित रक्कम परत करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

GRM प्रणाली : एकूण ९८८ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ८६१ तक्रारींचे निवारण करण्यात पोलिसांना यश आले आहे.

नागपूर सायबर पोलिसांच्या या धडक व यशस्वी कामगिरीमुळे नागरिकांमधून व व्यापारी वर्गातून पोलिसांचे कौतुक होत आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

अधिक वाचा