
जळगाव : भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती म्हणून निवडणूक लढवतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत ठरले आहे. पण खरंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक मानली जाते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने आज त्यांच्या कार्यालयामध्ये दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांनी भूमिका मांडली. जळगाव महानगरपालिकेसाठी उपस्थित जागांचा प्रस्ताव आम्ही भाजपाला देणार आहोत, असं अनिल पाटील म्हणाले. अनिल पाटील यांनी आपल्या पक्षासाठी जितक्या जागांची मागणी केली तेवढ्या जागा भाजप देणार नाही हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. पण मागणी करणे हे त्या नेत्यांचे काम आहे. ३५ जागांची मागणी केल्याने राष्ट्रवादी अजित पवार पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल, असेच यातून संकेत मिळत आहेत.
“प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार काल मुंबई येथे बैठक पार पडली. त्यांनी महानगरपालिका संदर्भात महायुती म्हणूनच निवडणूक लढवली जाईल, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तरी जळगाव महानगरपालिकेसाठी आमच्या पक्षाकडे जवळपास ७९ इच्छुक उमेदवारांचे अर्ज आम्हाला प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये आम्हाला उपस्थित जागा मिळाव्या यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत. जर काही जागांवर त्यांचे उमेदवार प्रबळ दावेदार असले तर एक-दोन पाऊल आम्ही मागे घ्यायला देखील तयार आहेत”, अशी प्रतिक्रिया अनिल पाटील यांनी दिली आहे.
खरंतर भारतीय जनता पार्टीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महानगरपालिकेमध्ये एकही उमेदवार त्यांचा नगरसेवक म्हणून निवडून आलेला नव्हता. त्यामुळे त्यांना जवळपास तीन ते पाच जागा भाजपकडून देण्यात येतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली होती. त्यामुळे आमदार अनिल पाटील ३५ जागांची मागणी करत असतील आणि भाजप आणि त्यांना तीन ते पाच जागा देऊ करत असेल तर राष्ट्रवादी नक्कीच स्वबळावर निवडणूक लढवेल, असेच यातून स्पष्ट संकेत मिळत आहेत.
यामुळे जळगाव महानगरपालिकेत भाजप-शिवसेना युती करू शकते. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवू शकतो, असेच संकेत आजच्या पत्रकार परिषदेत आमदार अनिल पाटील यांच्या बोलण्यातून मिळाले आहे. दरम्यान, “उद्या नगर परिषदेचा निकाल लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे या निवडणुकीत जवळपास ७० नगरसेवक जिल्ह्यात निवडून येतील आणि चार नगरपालिकांवरती नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल. त्यामुळे नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जिल्ह्यामध्ये वाढणार आहे”, असा दावा अनिल पाटील यांनी केला.





