लखनऊ – उत्तर प्रदेशात होळीच्या शुभेच्छा देणे अनु.जातीच्या व्यक्तीचा गुन्हा ठरला. होळीच्या शुभेच्छा दिल्यावरून एका ब्राह्मण कुटुंबियांकडून अनु.जातीच्या एका तरूणाची हत्या करण्यात आली. सूरज गौतम असे मृतकाचे नाव आहे. ही घटना ४ मार्च रोजी राजधानी लखनऊमधील दुबग्गा भागात घडली. जेव्हा बेगरिया गावात सर्वजण रंगांचा सण साजरा करत होते.
४ मार्च बुधवारी संध्याकाळी ५:३० च्या सुमारास, होळीचा सण सुरू असताना पेटिंगचे काम करणो २२ वर्षीय सूरज गौतमने शेजारच्या ब्राह्मण कुटुंबियांना होळी सणाच्या शुभेच्छा दिल्या. याचा शेजारी तिवारी कुटुंबियांना इतका राग आला कि मोहित तिवारी, त्याची बहीण शालिनी तिवारी आणि त्याची आई यांनी सूरजवर चाकूने सपासप वार केले. यामुळे सूरज गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. सूरजचे कुटुंब आणि स्थानिक रहिवासी हादरले. संतप्त कुटुंबाने ताबडतोब दुबग्गा पोलिस स्टेशन गाठले आणि गोंधळ घातला. न्यायाची मागणी करत त्यांनी स्टेशनबाहेर जवळजवळ तीन तास धरणे धरले. यानंतर पोलिसांनी मोहित तिवारी, त्याची बहीण शालिनी तिवारी आणि त्याच्या आईला ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. यानंतर आरोपींची तुरूंगात रवानगी करण्यात आली.
संपूर्ण घटनेचा व्हीडिओ सीसीटीव्हीत कैद झाला. जो आरोपी मोहितच्या घरी लावण्यात आला होता. त्यात स्पष्टपणे दोन पक्षांमध्ये भांडण होताना दिसत आहे, जवळचे लोक हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतर, भाऊ आणि बहीण सूरजवर चाकूने वार करू लागतात. आरोपी मोहित तिवारी घराकडे धावतो, आतून एक रॉड काढतो आणि लगेचच सूरजवर हल्ला करतो.
व्हिडिओमध्ये आरोपी मोहित स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याला ढकलतो, ज्यामुळे तो नाल्यात पडतो. त्यानंतर त्याची बहीण शिवानी चाकू घेऊन येते. ते सूरजला गाडीच्या मागच्या बाजूला ढकलतात आणि अनेक वार करून त्याला ठार मारतात. यादरम्यान, तिथे उपस्थित असलेले लोक सुरजला वाचवण्याचा प्रयत्न करतात.





