आयआयटी पवई येथील वसतिगृहात जिवंत काडतुसे सापडल्याचे प्रकरण उघड; पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु

SHARE:

मुंबई – आयआयटी पवई येथील वसतिगृहात जिवंत काडतुसे सापडल्याचे प्रकरण उघड झाले आहे. देशातील नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या आयआयटी पवई येथील वसतिगृहात जिवंत काडतुसे सापडल्याच्या प्रकरणाने मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. या संपूर्ण रॅकेटच्या मुळापर्यंत पोलीस पोहोचले आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत दिली आहे. विधान परिषदेत नियम ९३ अन्वये आमदार भाई जगताप यांनी या गंभीर विषयावर प्रश्न विचारले होते.

उत्तर देताना राज्यमंत्र्यांनी सांगितले की, आयआयटी मुंबईच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याच्या मित्राच्या बॅगेत जिवंत काडतुसे सापडली होती. आयआयटी ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्था असल्याने तिथे तपास करण्यासाठी पोलिसांना पूर्वपरवानगी घ्यावी लागली होती. आयआयटी मुंबईच्या वसतिगृहात जिवंत काडतुसे सापडल्याच्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचे बिहार कनेक्शन उघड झाले आहे. संबंधित विद्यार्थी आणि त्याचा मित्र हे दोन्ही बिहारचे रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

आयआयटी पवईमध्ये पाहुण्यांना राहण्याची परवानगी असल्याचा फायदा घेत हा मित्र वसतिगृहात राहत होता. पोलिस चौकशीत, त्याच्या बॅगेत सापडलेली ही जिवंत काडतुसे त्याने बिहारमधूनच मुंबईत आणल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी केवळ काडतुसे बाळगणाऱ्या आरोपी व त्याला मदत करणाऱ्या संपूर्ण साखळीला पकडले आहे.

काडतुसे पुरवणार्या मूळ व्यक्तीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे. ज्या विक्रेत्याकडून ही खरेदी करण्यात आली होती, त्याच्यावरही कडक कारवाई केली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाचा शोध घेऊन मुंबई पोलिसांनी हे रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. याप्रकरणातील सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा