पान विक्रीच्या नावाखाली नशेचा काळा बाजार; पोलिसांनी केला भांडाफोड, २ आरोपींना अटक

SHARE:

पुणे – पान विक्रीच्या नावाखाली नशेचा काळा बाजार उघडकीस आला आहे. या प्रकरणात २ जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे-सोलापूर महामार्गालगत पान शॉपच्या नावाखाली नशेचा बाजार चालला होता. खाण्याचे पान उघडून बघताच पुणे पोलीसही हादरले आहेत. ३५ रुपयांत मिळणाऱ्या पानामधुन नशेचा बाजार होत असल्याचे समोर आले आहे. पान विक्रीच्या नावाखाली नशेचा काळा बाजार पुण्यात खुलेआम चालू आहे.पुण्यातील लोणी काळभोर परिसरात पानशॉपच्या नावाखाली नशा सूरू असल्याची माहिती मिळाली होती.

पान विक्रीच्या नावाखाली नशेचा काळा बाजार करणाऱ्या टोळीचा आता पोलिसांनी भांडाफोड केला आहे. लोणीकाळभोर येथील कदमवाकवस्ती येथील मैफील पानशॉपवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी धाड टाकली आहे. या कारवाईत अंमली पदार्थ मिश्रित पाने आणि इतर साहित्य असा सुमारे १  लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी तपास केला असता, या पानांमध्ये ॲम्फेटामाइन, बेंझोडायझेपाइन्स आणि ओपिएटस असे अंमली पदार्थ मिसळले जात असल्याचे उघडकीस झाले आहे.
या प्रकरणात दुकान मालक निशांत काळभोर आणि कामगार रामजी पटेल यांना अटक करण्यात आली आहे. तर रोहित जवळकर हा आरोपी पळून गेला आहे. या पानाच्या माध्यमातून शाळा-कॉलेजातील विद्यार्थी निशाण्यावर होते. विद्यार्थ्याघ्च्या माध्यमातून हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू होता. ही नशेली पाने खाल्ल्यावर दारू किंवा सिगारेटसारखा कोणताही वास येत नाही. त्यामुळे शाळा-कॉलेजातील मुले नशा करत आहेत, हे पालकांच्या सहजासहजी लक्षात येत नाही.

शैक्षणिक संस्था, हॉस्टेल आणि शाळा-कॉलेज परिसरात या पानाची विक्री ही पानटपऱ्यांवर जोरात सुरू आहे. तर पुण्यातील तरुण पिढी छुप्या पद्धतीने या बेकायदेशीर व्यसनाच्या विळख्यात सापडत आहे. पुणे जिल्ह्यातील पूर्व हवेली परिसरात अशा प्रकारे 200 हून अधिक ठिकाणी ही नशेची दुकाने सुरू असल्याचा आरोप परिसरातील स्थानिक नागरिकांनी केला आहे. या कारवाईनंतर पुण्यातील लोणीकाळभोर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यातील इतर पान विक्रेत्यांवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे, असे पुणे पोलिसांनी म्हटले आहे. मात्र, या धक्कादायक प्रकरणांमुळे आणि अशा प्रकारे पुण्यात अनेक ठिकाणी नशेच्या पानांची खुलेआम विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने पुण्यातील लोणीकाळभोर परिसरातील मुलांच्या पालकांची चिंता वाढली आहे. पुणे-सोलापूर महामार्गालगत हे बेकायदेशीर नशेचा बाजार करणारे पान शॉप आहे. या प्रकरणात अधिक तपास पुणे पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा