हिमाचल प्रदेशात ५ दिवसांपासून जोरदार पाऊस व बर्फवृष्टी; राष्ट्रीय महामार्गांसह १०० रस्ते वाहतुकीसाठी बंद

SHARE:

शिमला – हिमाचल प्रदेशात ५ दिवसांपासून जोरदार पाऊस व बर्फवृष्टी होत आहे, त्यामुळे हिमाचल प्रदेशातील राष्ट्रीय महामार्गांसह १०० रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस व जोरदार बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिमाचल प्रदेशच्या उंच भागांत शुक्रवारी २० मार्च २०२६ रोजी जोरदार हिमवृष्टी तर खालच्या भागांत मुसळधार पाऊस झाला आहे. लाहौल परिसरातील बारालाचा, कुंजम, शिंकुला दर्रा तसेच घेपन पीक आणि सीबी रेंजमध्ये ७०  ते ८०  सेंटीमीटर पर्यंत बर्फ साचल्याची नोंद करण्यात आली आहे.

अटल टनल रोहतांग येथे ९० सेंटीमीटर बर्फवृष्टी झाली आहे. राज्याच्या धौलाधार पर्वतरांग, रोहतांग दर्रा आणि पांगी-भरमौरच्या उंच शिखरांवर हिमवृष्टी सुरू आहे. शिमला जिल्ह्यातील कुफरी, नारकंडा तसेच किन्नौरमधील छितकुल आणि कल्पा येथेही बर्फवृष्टी झाली. राजधानी शिमला, कांगडा, मंडी, चंबा, हमीरपूर आणि ऊना येथे दिवसभर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या ५ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस व जोरदार बर्फवृष्टीमुळे संपूर्ण हिमाचल प्रदेश राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे.

तर मार्च महिन्यात जानेवारी महिन्यासारखी थंडी जाणवत आहे. कमाल तापमानात मोठी घट होऊन ते १० अंशांपर्यंत खाली आले आहे. त्रिलोकनाथ परिसरात डोंगराचा मोठा हिमखंड चिनाब नदीत कोसळल्याने नदीचा प्रवाहाला अडथळा निर्माण झाला आहे. या परिस्थितीत मनाली-केलांग, आनी-कुल्लू आणि रामपूर-किन्नौर राष्ट्रीय महामार्गांसह १०० रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. जालोरी जोत येथे ४५ सेंटीमीटर बर्फवृष्टी झाल्यामुळे मार्ग बंद आहे, तर नाथपा परिसरात भूस्खलनामुळे वाहतूक थांबवली आहे.

मनाली-केलांग मार्ग बंद झाल्याने लाहौलचा संपर्क तुटला आहे. तेथे वीजपुरवठाही बंद झाला आहे. नालागढ भागात पावसामुळे गव्हाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. कांगडा जिल्ह्यातील नाल्यांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. खराब हवामानामुळे गगल विमानतळावर दिल्लीहून येणाऱी विमानाची उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. तर भुंतर विमानतळावर सलग तिसर्या दिवशीही कोणतीही विमान उड्डाणे झालीच नाहीत. विमान उड्डाणे बंद करण्यात आली आहे.

हिमाचल प्रदेश राज्यातील हवामान विभागाच्या माहितीनुसार, शनिवार व रविवारी उंच भागांत हिमवृष्टीसह जोरदार पावसाची शक्यता आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कुल्लू, लाहौल-स्पीति, चंबा आणि किन्नौर जिल्ह्यांमध्ये ३,००० मीटरपेक्षा अधिक उंचीवर हिमस्खलनाचा इशारा दिला आहे. शिमलामध्ये कमाल तापमान ८.४ अंश सेल्सियस नोंदले गेले, जे सामान्यापेक्षा ९ अंशांनी कमी आहे. मनालीत ४.८ अंश, भुंतरमध्ये ९.५ अंश, धर्मशाळेत १२.४ अंश, कल्पामध्ये ३.५ अंश आणि केलांग येथे ०.८ अंश तापमान नोंदले गेले आहे. तर केलांग हा राज्यातील सर्वात थंड भाग ठरला आहे. राज्यात पाऊस व हिमवृष्टी जोरदार होत आहे.

Leave a Comment

अधिक वाचा