नवी दिल्ली – अमेरिका-इस्रायल आणि ईराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतात होत आहे. या युद्धामुळे गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. लोकांना सिलेंडर मिळून राहिलेले नाहीत. देशभरात सिलेंडरसाठी रांगा पाहायला मिळत आहेत. या दरम्यान एलपीजीच्या नियमात मोठा बदल केला आहे. आता व्यावसायिक एलपीजी सिलेंडर खरेदीसाठी पीएनजी फॉर्म भरणे बंधनकारक असणार आहे.
या नवीन नियमानुसार, गॅस एजन्सी आता पीएनजी फॉर्मशिवाय व्यावसायिक गॅस सिलिंडर पुरवणार नाहीत. म्हणजेच याआधी गॅस सिलिंडर सहज उपलब्ध होत होते पण आता त्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता बंधनकारक असणार आहे. शहरांमध्ये पाईपद्वारे गॅस पुरवठा करणाऱ्या नेटवर्कचा विस्तार होत आहे. अशातच सरकार आता एलपीजीचा वापर कमी करण्याची योजना करत आहे. जेणेकरून शहरी भागातील नागरिक पीएनजीचाच जास्त वापर करतील. त्यामुळे सरकार एलपीजीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या तयारीत आहे.
सरकारचे लक्ष हळूहळू एलपीजीवरून पीएनजीकडे वळवणे आहे. पीएनजी हा अधिक सुरक्षित आणि पर्यावरणासाठी उत्तम पर्याय आहे. यामुळे गॅस पुरवठ्यावरील ताण कमी होईल आणि प्रदूषण देखील कमी होण्यास मदत होईल. दरम्यान, या बदलाचा परिणाम राजधानी दिल्लीमध्ये दिसून येत आहे. अहवालानुसार, दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या बुकिंगमध्ये जवळपास 30 टक्क्यांनी घट झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, भविष्यात हा कल आणखी वाढू शकतो. कारण जास्तीत जास्त नागरिक पीएनजीकडे वळत आहेत.
मात्र, या बदलामुळे हॉटेल्स, ढाबे आणि छोटे व्यवसाय करणाऱ्यांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे छोटे दुकानदार, हॉटेल, रेस्टॉरंट मालक चिंतेत आहेत. पीएनजी कनेक्शन्स सर्वत्र उपलब्ध नाहीत आणि एलपीजी मिळवण्याची नवीन प्रक्रिया वेळखाऊ आहे. याचा त्यांच्या कामकाजावर परिणाम होत असून, त्यामुळे त्यांचा खर्च वाढण्याची शक्यता आहे, कारण हे सर्वजण आधी एलपीजी सिलिंडरवर अवलंबून होते, असे त्यांचे मत आहे.
काही दिवासांपूर्वी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी इशारा दिला होता कि राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे पीएनजी गॅस जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी येत्या तीन महिन्यांत अर्ज करणे बंधनकारक आहे. अन्यथा त्या भागातील घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद केला जाऊ शकतो.
दुसरीकडे आठवडाभरात प्रक्रिया व्यावसायिक ग्राहकांसाठी व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. मात्र, त्याआधी तेल वितरण कंपन्यांनी ग्राहकांकडून ईयूसी म्हणजे ‘एंड यूज सर्टिफिकेट’ प्रमाणपत्र भरून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व एजन्सी व्यावसायिक ग्राहकांकडून हे प्रमाणपत्र भरून घेत आहेत. हे प्रमाणपत्र कंपनीकडे पाठवले जात असून मागणीनुसार येत्या आठवडाभरात व्यावसायिक गॅसचा पुरवठा होईल.
व्यावसायिक कारणांसाठी घेतलेला गॅस इतरत्र वळवला जाऊ नये, यासाठी गॅस कंपन्यांनी आता ग्राहकांकडून लेखी हमीपत्र घेण्यास सुरुवात केली आहे. या अर्जामध्ये ग्राहकाला आपल्या आस्थापनेचे नाव, पत्ता, जीएसटी क्रमांक आणि गॅस वापराचे नेमके कारण स्पष्ट करावे लागणार आहे. व्यावसायिक ग्राहकांनी हे प्रमाणपत्र वेळेत भरून आपल्या वितरकाकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गॅसचा पुरवठा तिसऱ्या व्यक्तीला केला जाणार नाही किंवा त्याचा कोणताही गैरवापर होणार नाही, अशी लेखी हमी ग्राहकाला द्यावी लागणार आहे. जर गॅसचा गैरवापर झाला, तर गॅस पुरवठा खंडित करण्यासोबतच कायदेशीर कारवाईचा इशाराही यात देण्यात आला आहे.





