अमरावती – येथील संत गाडगे बाबा विद्यापीठाच्या एका निर्णयाने वादाला तोंड फुटले आहे. विद्यापीठाने लेखक पवन भगत द्वारा लिखित ‘ते पन्नास दिवस’ ही बीए मराठीच्या द्वितीय वर्षाला अभ्यासासाठी असलेली कादंबरी अभ्यासक्रमातून हटवली आहे. ही कादंबरी भाजप सरकारविरोधी असल्याचा आक्षेप घेतल्याने ती हटवल्याचा आरोप केला जात आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे शैक्षणिक वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत.
काही महिन्यांपूर्वी मराठी अभ्यासमंडळाकडून एकमताने ‘ते पन्नास दिवस’ या कादंबरीचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला होता. विद्याशाखा आणि अकॅडमिक कौन्सिलनेही या अभ्यासक्रमास मान्यता दिल्यानंतर अध्यापनास सुरुवात झाली. मात्र, डिसेंबरमध्ये झालेल्या बैठकीत काही सदस्यांनी कादंबरीवर आक्षेप घेतला. यानंतर हा विषय पुनर्विचारासाठी अभ्यासमंडळाकडे पाठवण्यात आला. अभ्यासमंडळाने कादंबरीत आक्षेपार्ह काहीही नसल्याचं नमूद करत ती कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
दुसरीकडे, मोदी सरकारनं कोरोना लॉकडाऊनबाबत घेतलेल्या निर्णयांवर या कादंबरीत टीका करण्यात आल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला होता. अकॅडमिक कौन्सिलच्या बैठकीत या विषयावर मतदान घेण्यात आलं. त्यानंतर मतदानामध्ये २३ विरुद्ध ८ अशा बहुमताने ही कादंबरी अभ्यासक्रमातून हटवण्यात आली.
या कादंबरीवर आक्षेप घेणारं तीन पानी सविस्तर पत्र अकॅडमिक कौन्सिलच्या सदस्य संगीता जगताप यांनी कुलसचिवांना दिलं होतं. ही कादंबरी मोदी सरकारनं कोरोना लॉकडाऊनबाबत घेतलेल्या निर्णयावर टीका करते तसेच या काळाचं चुकीचं चित्रण करते, असा आक्षेप या पत्रातून घेण्यात आला होता. तसेच, पंतप्रधान मोदींचा आणि हिंदुत्ववाद्यांचा द्वेष करण्याचा आपला छंद मजुरांच्या दुःखाचा सहारा घेऊन जोपासण्याचा एक लाजिरवाणा प्रयत्न लेखकाने या कादंबरीरूपाने केल्याचं स्पष्टपणे दिसतं, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं होतं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही या कादंबरीवर आक्षेप घेणारं पत्र दिलं कुलसचिवांना दिलं होतं, अशीही माहिती मिळाली आहे.
विद्यापीठाने ही कादंबरी अभ्यासक्रमातून हटवल्यानंतर कादंबरीचे लेखक पवन भगत यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि ही कादंबरी अभ्यासक्रमातून हटवणे, ही विचारांची हत्या आहे. एका वास्तवाला गाडण्याचा प्रयत्न आहे. हे पुस्तकावरचे नियंत्रण आहे. सत्तेला भीती पुस्तकांची नसते, भीती असते, त्या पुस्तकातून उभ्या राहणाऱ्या जागृतीची. पूर्वी बंदी जाहीर व्हायची. आता बंदी अघोषित असते. ही अघोषित आणीबाणीच आहे, अशी टीका कादंबरीचे लेखक पवन भगत यांनी केली आहे.
ज्यांना एकछत्री राज्य आणायचं आहे, जे लोक सांस्कृतिकदृष्ट्या देशाला कमकुवत करू पाहत आहेत, अशांच्या अघोषित आणीबाणीचा हा प्रकार आहे. जे आपण पाहतो-अनुभवतो, ते लेखक म्हणून मी लिहितो. कुठल्याही विचाराने ग्रसित होऊन नव्हे, तर पन्नास दिवसांचा प्रवास जो लोकांनी भोगला, ते मांडण्याचा प्रयत्न या कादंबरीतून केला आहे. सध्याचं सरकार विरोधी मत ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. आपलीच मतं थोपवणं हे लोकशाहीला हानिकारक आहे, असंही ते म्हणाले.
पवन भगत म्हणाले कि मला असं वाटतं की, ही एकप्रकारे अघोषित आणीबाणी आहे. लेखनस्वातंत्र्यावर गदा येणं आणि सेन्सॉरशीप करणं उचित नाही. ही कादंबरी अभ्यासक्रमाला लावा, असा कसलाही अर्ज मी विद्यापीठांना कधीही केलेला नाही. विद्यापीठानेच हे पुस्तक स्वीकारलं होतं.





