वेदांता कंपनीच्या वीज प्रकल्पात बॉयलरचा स्फोट झाल्याने १७ कामगारांचा मृत्य, अनेक गंभीर; प्लांटच्या बॉयलरमधील दाब अचानक वाढल्याने झाला होता स्फोट

SHARE:

रायपूर – छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यातील वेदांता पॉवर प्लांटमध्ये झालेल्या बॉयलर स्फोटात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारी २  वाजण्याच्या सुमारास प्लांटमध्ये अचानक स्फोट झाला ज्यात चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर इतरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रशासनाच्या माहितीनुसार, या अपघातात एकूण ३६ कामगार जखमी झाले असून, त्यापैकी १८ जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. अनेक जखमींची प्रकृती गंभीर आहे.

प्राथमिक माहितीनुसार, प्लांटच्या बॉयलरमधील दाब अचानक वाढल्याने हा स्फोट झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की, जवळ काम करणारे कामगार थेट त्यात सापडले. या घटनेनंतर प्लांटच्या परिसरात घबराट पसरली. या अपघातात बाधित झालेल्या कामगारांमध्ये छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील कामगारांचा समावेश आहे. अनेक कुटुंबांतील सदस्य अद्याप असून त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंता आणि संताप पसरला आहे. अपघातानंतर कुटुंबीयांनी प्लांटबाहेर निदर्शने केली. व्यवस्थापन वेळेवर आणि अचूक माहिती देत ​​नसल्याचा त्यांचा आरोप आहे.

मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आणि मृतांच्या कुटुंबीयांना ५  लाख रुपये व जखमींना ५० हजारांची नुकसान भरपाई जाहीर केली.
शक्ती जिल्हयाचे एसपी प्रफुल्ल ठाकूर म्हणाले ही घटना काल दुपारी सुमारे २:३० वाजता घडली. युनिट १  मधील एक बॉयलर ट्यूब फुटली. त्यात अनेक कामगार जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून एकूण पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण १७ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. सर्व मृतांची ओळख पटली असून, १८ जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. आम्ही परिसरावर सतत लक्ष ठेवून आहोत. जिल्हाधिकारीही घटनास्थळी उपस्थित आहेत.

शक्तीचे पोलीस अधीक्षक प्रफुल्ल ठाकूर यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले कि वेदांता पॉवर प्लांटमधील बॉयलर ट्यूबमध्ये स्फोट झाला. माहिती मिळताच पोलीस ठाण्याला कळवण्यात आले आणि एक पथक तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आले. जखमींना सुरुवातीला जवळच्या रायगड रुग्णालयात नेण्यात आले, तर इतरांना नंतर इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले. आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून २० जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

त्यांनी पीटीआयला सांगितले की जिल्ह्यातील दाभरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंहितराई गावातील वेदांता लिमिटेडच्या वीज प्रकल्पात, बॉयलरमधून टर्बाइनकडे उच्च दाबाची वाफ वाहून नेणाऱ्या नळीत दुपारी २:३० च्या सुमारास हा स्फोट झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अमृत विकास तोपनो यांनी दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधित विभागांना अपघाताच्या सर्व पैलूंची सखोल चौकशी करून लवकरच अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शक्तीचे जिल्हाधिकारी अमृत विकास तोपनो म्हणाले कि सध्या आमचे लक्ष बाधित कुटुंबांना मदत करण्यावर आहे. मृतांना ३५ लाख रुपयांची नुकसान भरपाई आणि त्यांच्या कुटुंबीयांना नोकरी दिली जाईल, तर जखमींना १५ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळेल. वैद्यकीय खर्च प्लांट व्यवस्थापनाकडून उचलला जाईल.

या घटनेवर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष दीपक बैज म्हणाले कि हा अपघात नव्हे, तर हत्या आहे. सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष आणि प्रशासकीय निष्काळजीपणामुळे कामगारांना आपला जीव गमवावा लागला, असा आरोप त्यांनी केला. बैज यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १  कोटी रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा