माजी सरन्यायाधीश भूषण गवईंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचा अधिकार गमावला; धीरेंद्र शास्त्रीच्या भेटीवरून श्याम मानव यांची टीका

SHARE:

अमरावती – काही दिवासांपूर्वी देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कथेच्या माध्यमातून देशात अंधश्रद्धा पसरवणाऱ्या बागेश्वर धामचे साधू पंडित धीरेंद्र यांच्या आश्रमाला भेट दिली. यावरून समाज माध्यमांत भूषण गवई यांच्या टीकेचा भडीमार होत आहे. दरम्यान अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे (अंनिस) अध्यक्ष श्याम मानव यांनी भूषण गवई यांच्यावर टीका केली. भूषण गवई हे धीरेंद्र शास्त्रीच्या पाया पडून आशीर्वाद घेत असतील तर त्यांनी डॉ. आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार गमावलेला आहे, असे टीकास्त्र श्याम मानव यांनी सोडले. ते अमरावतीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

काही दिवासांपूर्वी भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम आश्रमाला कुटुंबासह भेट देऊन लोकांचे भविष्य सांगणार्या धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतली. या भेटीची फोटो समाज माध्यमांवर देखील व्हायरल झाले आहेत. यावरून माजी सरन्यायाधीशांवर टीका केली जात आहे. दरम्यान अंनिसचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनीही माजी चीफ जस्टिस भूषण गवईंवर टीका केली आहे.

अमरावतीमध्ये पत्रकार परिषदेत श्याम मानव म्हणाले कि भूषण गवई धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या पाया पडायला गेले होते, याचा मला प्रचंड शॉक बसलाय. भूषण गवई आंबेडकरी विचारांचं दूध प्यायल्याचा दावा करतात. पण ते जर धीरेंद्र शास्त्रीच्या पाया पडून आशीर्वाद घेत असतील तर यापुढे त्यांनी डॉ. आंबेडकरांचे नाव कधीही घेऊ नये, हा अधिकार त्यांनी गमावलेला आहे. असा टोला श्याम मानव यांनी भूषण गवईंना लगावला आहे. श्याम मानव म्हणाले की यापूर्वी धीरेंद्र शास्त्री या विकृत बाबाचा दीक्षाभूमीवर सत्कार घेण्यात आला होता. त्यावेळेस मी त्याला विरोध केला होता.

माजी सरन्यायाधीशांसारख्या उच्च घटनात्मक पदावर राहिलेल्या व्यक्तीने अंधश्रद्धा पसरवणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींच्या पाया पडणे हा धक्कादायक प्रकार असल्याचे श्याम मानव म्हणाले. ते पुढे म्हणाले कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर्कसंगतता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार मांडला. मात्र माजी सरन्यायाधीश भूषण गवई हे अंधश्रद्धा पसरवणार्या धीरेंद्र शास्त्री या बाबाच्या भेटीला गेले. त्यांनी अशा कृती करणे संविधानाला अपेक्षित नाही. असही श्याम मानव म्हणाले.

दरम्यान, पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी नागपुरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारं वक्तव्य केलं. ज्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. इतिहासाची तोडमोड करून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमान करणारं वक्तव्य केलय. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं असून पुण्यात धीरेंद्र शास्त्रींच्या फोटोला जोडेमार आंदोलन करण्यात आलं. दरम्यान धीरेंद्र शास्त्रीवर कारवाईची मागणी शिवप्रेमींकडून केली जात आहे.

Leave a Comment