ठाणे – जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाकडून व्यावसायिकांवर धाड टाकून 7 लाखांहून अधिक किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. तर याप्रकरणात पोलिसांकडून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ठाण्यात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कडक कारवाई केली आहे. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ठाणे जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली 27 मे 2026 रोजी एक मोठी मोहीम राबवली आहे.
या मोहिमेत अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अनेक अन्न व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी विविध अन्न व्यावसायिकांची पडताळणी करून 7 लाख 30 हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा साठा जप्त केला आहे. यामध्ये 1,49,724 रुपयांचे खाद्यतेल, 93,830 रुपयांचे फरसाण, 2,06, 800 रुपयांचे तूप, 8,190 रुपयांचे हक्का नुडल्स, 17,100 रुपयांची ताडी, 54,096 रुपयांचे शरबत आणि 1,97,640 रुपये किंमतीच्या डिंकाचा समावेश आहे.
याशिवाय, याच दिवशी प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 4,53,344 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनाने सर्व अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि स्वच्छता राखण्याचे कडक आदेश दिले आहेत.
नागरिकांना अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत काही तक्रार असल्यास त्यांनी प्रशासनाचा टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधावा. किंवा वागळे इस्टेट, ठाणे येथील सह आयुक्त कार्यालयात लेखी तक्रार करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्याच्या रक्षणासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अशी कडक कारवाई यापुढेही नियमितपणे सुरू राहील, असा इशारा ठाणे जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






