नागपूर – वसतिगृहातील असुविधांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर एका विद्यार्थिनीला वसतिगृहाबाहेर काढण्याची नोटीस बजावल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात समोर आला आहे. सावित्रीबाई फुले वसतिगृहात राहणार्या एका विद्यार्थिनीला नोकरी करत असल्याचे, कारण देत वसतिगृह रिकामे करण्यास सांगण्यात आले. आकांक्षा उके असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती बेसा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहात राहून एमबीएचे शिक्षण घेत आहे. आकांशा ही अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असून गरीब शेतकरी कुटुंबातील आहे.
प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, नागपूरातील शासकीय सावित्रीबाई फुले वसतिगृहात कडाक्याच्या उन्हाळ्यातही कुलर्स किंवा पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. यामुळे विद्यार्थिनींचे हाल होत होते. यासाठी आकांक्षाने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. मात्र याचा राग वसतिगृहाच्या अधिकार्यांनी थेट आकांशावर काढण्यास सुरुवात केली. आकांक्षा केवळ एका ट्रेनिंगचा भाग असून ती नोकरी करत असल्याचे खोटे कारण अधिकार्यांनी पुढे केले आणि तिला तातडीने वसतिगृह रिकामे करण्याची नोटीस बजावण्यात आली. इतकेच नाही तर आकांक्षाकडून गेल्या 6 महिन्यांपासून राहत असल्याचा निवास आणि भोजनाचा खर्चही वसूल करण्याची धमकी नोटीसीत देण्यात आली.
आकांक्षाच्या मते, 4 मे रोजी आम्ही आमच्या अडचणी मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो. पण वसतिगृह प्रशासनाने थेट मुख्यमंत्र्यांकड जाणे योग्य नसल्याचे सांगितले. काही अडचण असेल तर समाजकल्याण विभागाकडे तक्रार करायला हवी होती. मात्र त्यानंतर वसतिगृह प्रशासनाने याचा राग ठेवत तिला वसतिगृहाबाहेर काढण्याची नोटीस बजावली. ती नोकरी करते, असे कारण देत तिला वसतिगृह सोडण्याची नोटीस बजावली. आकांक्षाच्या म्हणण्यानुसार, ती रोजगाराची चांगली संधी मिळावी यासाठी मिहान येथील टीसीएसमध्ये बीपीओ ट्रेनी म्हणून प्रशिक्षण घेत आहे.
हेच कारण पुढे करीत वसतिगृह प्रशासनाने 25 मे रोजी तिला वसतिगृह सोडण्याची नोटीस बजावली. आकांक्षाचे म्हणणे आहे कि मी कुठेही नोकरी करत नाही. मी केवळ इंटर्नशिप करत आहे आणि तो माझ्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. मात्र आकांक्षाला वसतिगृह सोडण्याची नोटीस बजावण्यात आली. एवढेच नाही तर वसतिगृहात जेवढे दिवस ती निवासाला होती, त्या काळातील निवासभत्ता आणि भोजनाचा खर्चही वसूल करण्याची धमकी या नोटीसद्वारे देण्यात आली आहे. नोकरी करणार्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची परवानगी नाही, प्रशासनाचे म्हणणे आहे.
दरम्यान हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर बुधवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोनवर संवाद साधत आकांक्षाला धीर दिला. ‘तुला वसतिगृह सोडण्याची अजिबात गरज नाही. असं त्यांनी सांगितलं. यामुळे आकांक्षाला सध्या दिलासा मिळाला असला तरी परीक्षेनंतर तिच्यावर कारवाई होईलच, असे बोलले जात आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






