​१५ लाख कोटींचा ‘महाबोगस’ खेळ! गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या सोने कंपनीचा काळा कारनामा उघड

SHARE:

मुंबई – शेअर मार्केटमध्ये 15 लाख कोटींचा घोटाळा उघड झाला आहे. सोने व्यवसायाशी संबंधित कंपनीने गुंतवणूकदारांना बोगस महसूल दाखवल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईत शेअर बाजारात 1000 रुपयांचा शेअर 100 वर आला आहे. तर बोगस महसूल दाखवून 15 लाख कोटींचा घोळ केल्याचे प्रकरण समोर आले आहे. एकेकाळी 1,000 रुपयांहून अधिक भाव गाठलेल्या राजेश एक्सपोटर्सच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. सेबीच्या अंतरिम आदेशानंतर गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शेअर बाजारात नावाजलेल्या आणि सोन्याच्या व्यवसायाशी संबंधित असलेल्या राजेश एक्सपोटर्स या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मोठे परतावे दिले होते.

कंपनीचा शेअर एकेकाळी 1,029.70 रुपयांपर्यंत पोहोचला होता. कंपनीचा व्यवसाय वेगाने वाढत आहे, महसूल सातत्याने वाढत आहे आणि भविष्यात मोठी प्रगती होणार आहे असे गुंतवणूकदारांना वाटत होते. मात्र 4 जून रोजी लाखो गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. आदल्या दिवशी 109.38 रुपयांवर बंद झालेला कंपनीचा शेअर बाजार उघडताच 103.92 रुपयांवर घसरला आहे. आणि त्यानंतर खरेदीदारच गायब झाले आहेत. शेअर लोअर सर्किटमध्ये अडकला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये एकच प्रश्न निर्माण झाला की, कंपनीसोबत नेमके काय घडले. या प्रश्नाचे उत्तर सेबी यांनी जारी केलेल्या 109 पानी अंतरिम आदेशात दडलेले आहे.

सेबीच्या तपासात धक्कादायक घटना समोर आली आहे. वित्तीय वर्ष 2020-21 ते 2024-25 या कालावधीत कंपनीने 15.15 लाख कोटी रुपयांचा एकत्रित महसूल दाखवला होता. मात्र तपासात या महसुलातील मोठ्या भागाची स्वतंत्र पडताळणी होऊ शकली नाही. सेबीच्या आरोपानुसार या कालावधीत कंपनीच्या एकूण एकत्रित महसुलापैकी तब्बल 99.80 टक्के हिस्सा अशा आकडेवारीवर आधारित होता. ज्याची स्वतंत्रपणे खातरजमा करता आली नाही. तपासात असे आढळले की, कंपनीच्या एकत्रित महसुलापैकी 97 ते 99 टक्के हिस्सा परदेशातील उपकंपन्यांमधून दाखवण्यात आला होता. यामध्ये वल्कंबी एसए या कंपनीचे नाव होते.

कागदोपत्री पाहता कंपनीचा व्यवसाय मोठा आणि वेगाने वाढणारा दिसत होता. मात्र सेबीने परदेशी कंपन्यांचे ऑडिट केलेले आर्थिक अहवाल तपासल्यानंतर खरेे चित्र समोर आले आहे. समूह स्तरावर दाखवण्यात आलेला महसूल आणि उपलब्ध आर्थिक नोंदी यांच्यात मोठी विसंगती आढळल्याचा सेबीकडून दावा करण्यात आला आहे. सेबीने उपस्थित केलेल्या सर्वात मोठ्या प्रश्नांपैकी एक म्हणजे सोन्याच्या रिफायनिंग आणि प्रोसेसिंग व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाची नोंद. नियामक संस्थेच्या मते कंपनीने सोने शुद्धीकरण आणि प्रक्रिया करण्यासाठी मिळणारे सेवा शुल्क दाखवण्याऐवजी संपूर्ण सोन्याच्या व्यवहाराचे मूल्यच महसूल म्हणून नोंदवले आहे.

सेबीच्या मते राजेश एक्सपोटर्सने काही व्यवहारांमध्ये फसवणुकीची पद्धत वापरली आहे. तसेच यासंदर्भातील ग्राहकांची माहिती, बिले आणि इतर आवश्यक कागदपत्रेही पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आली नाहीत. तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सेबीने अंतरिम आदेश जारी करून तपास सुरू ठेवला आहे. जर पुढील तपासात हे सर्व आरोप सिद्ध झाले, तर हा केवळ लेखापरीक्षणातील किंवा आर्थिक अहवालांतील त्रुटींचा विषय राहणार नाही. हा विषय कॉर्पाेरेट गव्हर्नन्स, पारदर्शकता आणि गुंतवणूकदारांच्या विश्वासाशी संबंधित मोठा घोटाळा ठरू शकतो. यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. एकेकाळी 1,000 रुपयांच्या पुढे गेलेला शेअर आता 100 रुपयांच्या आसपास घसरल्याने शेअर मार्केटमधील हजारो गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment