जळगाव – अमळनेर-धुळे महामार्गावर तिहेरी अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर-धुळे महामार्गावर सोमवारी सकाळी तिहेरी अपघात झाला. एसटी बस, कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
हा अपघात सकाळी मंगरूळ गावाजवळील हॉटेल वृंदावन परिसरात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, अमळनेरकडून धुळ्याकडे जाणारी एसटी बस, एक कार आणि दुचाकी मार्गावर असताना समोरून येणाऱ्या गुजरात पासिंग कारने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा चुराडा झाला. दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
तसेच कारमधील महिला आणि पुरुषांसह एकूण 6 जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारचा पूर्णपणे चूराडा झाला होता. या अपघातात एक लहान मुलगा कारमध्ये अडकून पडला होता. स्थानिक नागरिक, पोलीस आणि एसटी कर्मचाऱ्यांनी मदतकार्य सुरू करून मुलासह इतर जखमींना बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमी लोकांना उपचारासाठी गुजरातमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या भीषण अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली आणि घटनेचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास जळगाव पोलिस करत आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






