अमरावती : प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीप हंगाम सन 2026-27 करीता शेतकरी सहभागा सुरुवात झाली आहे. या हंगामासाठी जिल्ह्याकरिता ‘इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी’ची निवड करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना हक्काचे विमा संरक्षण देणे, हा या योजनेचा हेतू आहे. पिकांच्या नुकसानीच्या कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राहावे, तसेच त्यांना नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे.
या योजने अंतर्गत खरीप हंगामातील विविध प्रमुख पिकांच्या उत्पादनात येणाऱ्या घटीपासून शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि नुकसान भरपाई मिळणार आहे. चालू हंगामासाठी पीक विमा उतरवण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2026 आहे. कृषी विभागाकडून जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधूंना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता 31 जुलै 2026 पूर्वी आपल्या पिकांचा विमा काढून या योजनेचा लाभ घ्यावा. योजनेबाबत सविस्तर माहितीसाठी शेतकरी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका स्तरावर तालुका कृषी कार्यालयाशी थेट संपर्क साधावा.
या योजनेत मृत शेतकऱ्यांच्या नावे तसेच इतर अवैध मार्गाने पीक विमा काढल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अर्ज त्वरित रद्द केला जाईल. योजनेमध्ये सहभागासाठी शेतकऱ्यांकडे ‘अॅग्रीस्टॅक शेतकरी ओळखपत्र क्रमांक’ असणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच पीक विमा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ‘ई-पीक पाहणी’ अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक राहील. पीक विम्याचा अर्ज करताना शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक, 7/12, 8अ, आधार कार्ड, बँक पासबुक आणि स्वयंघोषणा पत्र ही आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे गरजेचे आहे.
या योजनेतंर्गत विविध पिकांसाठी विमा संरक्षित रक्कम आणि प्रति हेक्टर शेतकरी हिस्सा (विमा हप्ता) निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये भात (तांदूळ) पिकासाठी 65 हजार रुपये संरक्षित रकमेवर 650 रुपये हप्ता, खरीप ज्वारीसाठी 33 हजार रुपये संरक्षित रकमेवर 660 रुपये हप्ता, तर सोयाबीनसाठी 62 हजार 500 रुपये संरक्षित रकमेवर 1 हजार 250 रुपये हप्ता ठरवण्यात आला आहे. याशिवाय मूग पिकासाठी 29 हजार 700 रुपये रकमेवर 594 रुपये हप्ता, तूर पिकासाठी 47 हजार रुपये रकमेवर 940 रुपये हप्ता,कापूस पिकासाठी 65 हजार रुपये रकमेवर 975 रुपये हप्ता, मक्यासाठी 40 हजार रुपये रकमेवर 800 रुपये हप्ता आकारला जाईल.
सी.एस.सी. केंद्रांमार्फत अर्ज करताना शेतकऱ्यांनी पीकनिहाय निश्चित केलेल्या शेतकरी हिश्श्याच्या रकमेपेक्षा अधिक पैसे देऊ नयेत. जर कोणत्याही केंद्रावर अतिरिक्त पैशांची मागणी केली गेल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभाग किंवा तहसील कार्यालयाकडे तात्काळ तक्रार करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अखेरच्या दिवसांत पीक विमा पोर्टलवर तांत्रिक लोड येऊन संथ गतीने काम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर जवळच्या सी.एस.सी. केंद्राशी संपर्क साधून योजनेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती अर्चना निस्ताने यांच्या वतीने करण्यात आले आहे.
(स्रोत – कृषी विभाग, अमरावती.)
Author: आकाश रमेशराव दानखडे
लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.






