पाटणा : देशातील दिग्गज राजकीय पक्षांचे रणनीतिकार म्हणून संपूर्ण भारताची मने जिंकणारे आणि पडद्यामागून राजकारणाची दिशा ठरवणारे प्रशांत किशोर यांनी आता प्रत्यक्ष चुनावी राजकारणातही ऐतिहासिक विजय मिळवला आहे. बिहारमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांनी विजय मिळवत आपल्या ‘जन सुराज पक्षाला’ पहिल्यांदा यश मिळवून दिले आहे. या विजयामुळे बिहारच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली असून, राष्ट्रीय पातळीवरही याची चर्चा रंगू लागली आहे.
भाजपचा ३० वर्षांचा गड उध्वस्त –
बांकीपूर हा मतदारसंघ म्हणजे भारतीय जनता पक्षाचा अत्यंत सुरक्षित आणि अभेद्य गड मानला जात होता. १९९५ पासून (जेव्हा हा मतदारसंघ पटना पश्चिम म्हणून ओळखला जात होता) सलग तीन दशके या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती, ज्यामुळे येथे पोटनिवडणूक घेण्यात आली.
या जागेवर भाजपने आपले युवा नेते नीरज कुमार यांना उमेदवारी दिली होती, तर राष्ट्रीय जनता दलने रेखा कुमारी यांना रिंगणात उतरवले होते. मात्र, सर्व राजकीय समिकरणांना बाजूला सारत जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी भाजपच्या या ३० वर्षांच्या किल्ल्याला खिंडार पाडले.
अटीतटीच्या लढतीत दणदणीत मताधिक्य –
पाटणातील ए. एन. कॉलेजमध्ये झालेल्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच प्रशांत किशोर यांनी आघाडी घेतली होती. सर्व ३१ फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर प्रशांत किशोर यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार यांचा तब्बल १८,९५३ मतांच्या फरकाने पराभव केला.
प्रशांत किशोर (जन सुराज पक्ष) : ६३,२०३ मते
नीरज कुमार (भाजप) : ४४,२५० मते (दुसऱ्या क्रमांकावर)
रेखा कुमारी (आरजेडी) : १४,०८५ मते (तिसऱ्या क्रमांकावर)
या विजयामुळे विरोधकांना मोठा धक्का बसला असून जन सुराज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाटणा येथील पक्षाच्या मुख्यालयाबाहेर एकच जल्लोष केला. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
‘सुरक्षित जागा’ टाळून प्रशांत किशोर यांचा मास्टरस्ट्रोक
विशेष म्हणजे, राजकारणात नवीन प्रवेश करताना अनेक नेते सुरक्षित मतदारसंघ शोधतात, परंतु प्रशांत किशोर यांनी जाणीवपूर्वक भाजपच्या सर्वात मजबूत बांकीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. “बिहारमधील जनतेला जात आणि धर्माच्या राजकारणाबाहेर काढून विकासावर मतदान करायला भाग पाडायचे असेल, तर सुरक्षित जागा शोधून चालणार नाही,” अशी भूमिका त्यांनी प्रचारादरम्यान घेतली होती. त्यांचा हा पैज अत्यंत यशस्वी ठरला असून, मतदारांनी त्यांच्या पारदर्शक राजकारणाच्या हाकेला साद घातल्याचे या निकालावरून स्पष्ट होते.
निवडणुकीपूर्वीचा वाद आणि प्रशासनावर ताशेरे –
मतमोजणीच्या काही तास आधी प्रशांत किशोर यांनी पाटणा पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. रविवारी रात्री उशिरा पत्रकार परिषद घेत त्यांनी, प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनाकारण डांबून ठेवले जात असल्याचा दावा केला होता. तसेच याविरोधात निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. या सर्व राजकीय घडामोडींदरम्यान झालेला हा विजय प्रशांत किशोर यांच्यासाठी अत्यंत दिलासादायक आणि मोठा राजकीय बूस्टर ठरला आहे.
बिहारच्या राजकारणावर दूरगामी परिणाम –
यापूर्वी नोव्हेंबर २०२५ मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत जन सुराज पक्षाने सर्व २३८ जागांवर आपले नशीब आजमावले होते, परंतु पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. पक्षाच्या त्या अपयशानंतर विरोधकांनी प्रशांत किशोर यांच्यावर टीका केली होती. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच बांकीपूरची पोटनिवडणूक जिंकून प्रशांत किशोर यांनी आपण राजकारणात दीर्घकाळ टिकण्यासाठी आणि मोठे परिवर्तन घडवण्यासाठी आलो आहोत, हे सिद्ध करून दाखवले आहे.
बांकीपूरचा हा निकाल बिहारच्या आगामी राजकारणाची दिशा ठरवणारा ठरू शकतो आणि राज्यातील पारंपरिक पक्षांसमोर ‘जन सुराज’ एक मजबूत पर्याय म्हणून उदयाला येत असल्याचे यावरून अधोरेखित होते.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
मुख्य संपादक सा. रयत रक्षक, महाराष्ट्र. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र.






