तुकारामाच्या आयुष्याचे महत्त्वाचे तीन टप्पे आहेत.
वैयक्तीक दुःखातून अनुभवलेले सुख-दुःख, समाजाभिमुखता आणि विश्वात्मकता
तुकाराम त्रिविध तापानी पोळून निघाले होते. अशा परिस्थितीत मनुष्य वेगवेगळ्या वाटेने जातो. कोणी व्यसनाधीन होतो, तर कोणी परमार्थाचा वाटसरू होतो, तुकारामांनी परमार्थाची कास धरली. एकामागून एक येणाऱ्या आपत्तीमुळे तुकारामांना संसाराचा विट आला. कारणेही तशीच घडली. व्यापार बुडाला, सावकारी बसली. दिवाळे निघाले. त्यामुळे त्यांचे संसारात मन लागेना, त्यांनी संसाराकडे पूर्ण दुर्लक्ष केले.
बरे झाले देवा निघाले दिवाळे l
बरी या दुष्काळे पीडा केली लाल ||
असे उदगार काढले,आणि आपल्या मनाच्या विमनस्क स्थितीला स्थिर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पुढे पुढे आपले पूर्ण लक्ष पांडुरंगाच्या उपसनेवर स्थिर करण्याचा प्रयत्न सुरू केला. दुष्काळा नंतर पून: तुकारामांनी संसार सुरू केला. पण तो मनापासून नव्हता. ते संसारात नाममात्र गुंतले. कारण तो एका विरक्तचा संसार होता. जिजाऊ पासून त्यांना तीन मुली, व दोन मुले झाले. दिवाळे निघाले होते, पण घराची परिस्थिती अजूनही बऱ्यापैकी होती. प्राप्त परिस्थितीत बऱ्यापैकी दिवस जात होते. कान्होबाने वाटा मागितला. तेव्हा मोठ्या मनाने तुकारामांनी तो सहज देऊन टाकला..
त्यानंतर जे कर्ज रोखे उरले होते. ते तुकारामांनी चक्क इंद्रायणी नदीत बुडवून टाकले. बुडवून टाकताना त्यांनी बायको मुलाबाळांचा देखील विचार केला नाही. भौतिक सुख संपत्तीत त्यांना अडकायचे नव्हतेच. ज्या द्रव्यांनी भौतिक सुखे प्राप्त होतात ती साधनेच त्यांनी नदीत अर्पण करून टाकली. ऐन तारुण्यात त्यांना असे विरक्तीचे डोहाळे लागले. लोभ, मोह, आसक्ती वर त्यांनी असा विजय मिळविला. त्यांच्या भविष्यासाठी परमार्थाची वाट त्यांनी निश्चित केली. त्यांच्या मालकीचे पांडुरंगाचे देऊळ त्यांनी दुरुस्त करून घेतले. जीवनाच्या क्षणभंगुरतेची कल्पना आल्याने त्यांनी संपूर्णपणे स्वतःला पांडुरंगाच्या भक्तीत बुडवून टाकले.
शके १९५२ च्या त्या भयंकर दुष्काळानंतर तुकारामांना प्रपंचात एक प्रकारची उदासीनता वाटू लागली. मनात वेगवेगळ्या प्रकारचे विचारचक्र सुरू झाले. अशी कोणती सत्ता आहे की ज्यामुळे जगातील सर्व चेतन अचेतन व्यापार चालतात, जगातील सर्व व्यवहार चालतात. त्या शक्तीच्या शक्तीमुळे कोणाचे तरी भाग्य फळफळते, कोणाला तरी दुर्दैवाचे फेरे भोगावे लागतात. अशा सत्तेचा शोध तुकारामांचे अंतकरण घेऊ लागले. याच सत्तेचा त्यांनी रात्रंदिन ध्यास घेतला. या सत्तेच्या शोधासाठी तुकाराम कमालीचे हट्टी बनले. त्यासाठी कासावीस झाले, तुकारामांची स्वभाव वृत्ती अशी होती की मनाला एखादी गोष्ट पटली की, त्या गोष्टीसाठी सर्वस्व पणाला लावयाचे. तुकारामांना ती सत्ता नको होती तर त्या सत्तेचा दास व्हायचे होते. त्या सत्तेचा दास होण्यासाठी त्यांनी मनाची तयारी केली होती. तुकाराम त्यांच्या सवयी नुसार सत्त्याचा निवाडा स्वत: जवळच करत असत. स्वतः अनुभव घेत असत. “आधी केले, मग सांगितले” अनुभवाशिवाय तुकारामांनी कोणतीच गोष्ट सांगितली नाही. “अनुभव येथे व्हावा शिष्टाचार” या न्यायाने ते वागत असत..
श्रीमद् भगवतगीतेचे व एकनाथी भागवताचे त्यांनी पारायण केले. त्यामुळे त्यांची ईश्र्वराप्रती श्रद्धा आणि भक्ती वाढली. वाचनातून ज्ञान मिळाले. तुकारामांची वृत्ती हळूहळू बदलत गेली. अनंत दैवी आघातानी आणि दुष्काळाने पोळलेल्या तुकारामांमध्ये भक्ती आणि ज्ञानाचा सुंदर संगम दिसू लागला त्यांची वृत्ती बदलली. स्वभाव शांत झाला. चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसायला लागला. तुकाराम अंतर्यामी बदलू लागले.
तुकारामांचे आठवे पूर्वज विश्वंभरापासून ते वडील बोल्होबा पर्यंत सारेच विठ्ठल भक्त होते. तुकारामांचे घराणे भगवद भक्त म्हणून देहू गावात प्रसिद्ध होते. त्यांच्या घराण्यात नामस्मरण, संतसंग, भजन, कीर्तन ह्या परंपरा असून ते त्यातच रमत असत. त्यांनी पंढरीच्या सोळा वाऱ्या देखील केल्या होत्या. त्यांच्या घराण्यातील पांडुरंगाची सेवा, भगवतभक्तीची तन्मयता पाहून प्रत्यक्ष विठ्ठलच त्यांना म्हणाला, “मीच तुझ्या घरी येतो” असा साक्षात्कार तुकारामांना झाला. कर्मधर्मसंयोगाने हा साक्षात्कार खरा झाला आणि विश्वंभर बुवांना विठ्ठलाची मूर्ती शेतात सापडली. ती मूर्ती घरी आणून त्यांनी घराजवळच मंदिर बांधून त्यात मूर्तीची प्रतिष्ठापना केली. अशा भक्ती परायण घराण्यात तुकारामांचा जन्म झाला. भगवत भक्तीचे हेच संस्कार तुकारामात आले आणि तुकारामांनी आयुष्यभर भगवद भक्ती करून हे संस्कार जोपासले.
एकीकडे संसार व दुसरीकडे भगवद भक्तिकडे वळताना प्रथमतः तुकारामांची स्थिती दोलायमान झाली. या मार्गाचे अनुसरण करताना तुकारामाच्या मनात आंदोलने निर्माण झाली. संसार की परमार्थ.? यातला परमार्थ निवडताना त्यांनी अंतर्मुख होऊन विचार केला. त्यांची वृत्ती अंतर्मुख बनली. त्यांच्या विचाराचे पारडे परमर्थाकडेच झुकत होते. अनेक अस्मानी संकटे झेलून ही त्यांना परमार्थ मार्गच आपलासा करावासा वाटत होता. शेवटी त्यांनी परमार्थ मार्गच चोखाळला. डोक्यात सतत परमार्थाचा विषय घोळत असताना त्यांच्या आयुष्यात गुरुपदेशाची घटना घडली.
सदगुरु राये कृपा मज केली l
परी नाही घडली सेवा काही ll
सापडविले वाटे जाता गंगास्नान l
मस्तकी जो जाणा ठेविला कर ll
बाबाजी आपले सांगितले नाम l
मंत्र दिला रामकृष्ण हरी ll
राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य अशी गुरू परंपरा तुकारामांनी सांगितली आहे. तुकारामांना स्वप्नात बाबाजी चैतन्य यांनी दर्शन दिले. मस्तकावर हात ठेवून “रामकृष्ण हरी” हा मंत्र दिला. हा गुरुपदेशाचा प्रसंग २३ जानेवारी १६४०, गुरुवार( माघ दशमी शके १५६१ गुरुवार) या दिवशी घडला.
वारकरी संप्रदायात “रामकृष्ण हरी” या मंत्राला खुप महत्त्व आहे. भजन, कीर्तनाचा आरंभ या मंत्राचा गजर करूनच होतो. आपल्या अनेक अभंगातून तुकारामांनी या मंत्राचा वारंवार उच्चार केला आहे. तुकारामांनी वारकरी आणि गोसावी अशा दोन्ही पंथाचा आपल्या अध्यात्म साधनेसाठी उत्तम उपयोग करून घेतला आहे. तुकारामांनी आपल्या साधकावस्थेपासून ते सिद्धावस्थेपर्यंतचा प्रवास करताना एकांत, विठ्ठलाचे नामस्मरण, एकादशी व्रत कीर्तन, संत वचनांचे पाठांतर, ज्ञानेश्वरी, भगवदगीता, ह्यांची पारायणे, संतसेवा, लोक लज्जेचा त्याग, संसारा विषयी उदासीनता, अशा क्रमाने परमार्थाची वाटचाल सुरू केली. लोकांचा संपर्क टाळून, एकांत साधना करता यावी म्हणून देहुजवळील भंडारा डोंगरावर जाऊन अखंड नाम साधना सुरू केली. त्याला इतर साधनांची जोड दिली. उदा. गीता, भगवंताची पारायणे सुरू केली. दिवसरात्र नामभक्ती व अभ्यासामुळे, त्यांच्या ठिकाणी विरक्ती दृढ होऊ लागली. सतत आत्म चिंतन करून अंतर्बाह्य ते शुद्ध झाले. त्यांनी अन्न वस्त्राची ही परवा केली नाही.
झाला प्रेत रूप शरीराचा भाव |
लक्षियेला ठाव स्मशानीचा ll
रडती रात्रदिवस कामक्रोध माया |
म्हणती हाय हाय यमधर्म ll
शेणी लागल्या शरिरा |
ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेसी ll
फिरविला घट फोडायला चरणी |
महावाक्य ध्वनी बोंब झाली ll
दिली तिलांजळी कुळ नाम रुपासी |
शरीर ज्याचे त्यासी समरपिले ll
तुका म्हणे रक्षा झाली आपोआप |
उजळीला दीप गुरुकृपा ll
तुकारामांची अवस्था अशा प्रकारे त्यांनीच आपल्या अभंगातून सांगितली आहे. कोणतीही उपासना गुरुकृपेशिवाय सिद्धीस जात नाही. हे एक पारमार्थिक सत्य आहे व खऱ्या साधकाला गुरू शोधावा लागत नाही. तो गुरुकृपेने, त्याच्या आंतरिक तळमळीने, शुध्द भक्तीमुळे, त्याला मिळतोच. दिवाळे निघाल्यामुळे तुकारामाचा पारमार्थिक, अध्यात्मिक फायदा झाला. म्हणून देव जेजे करतो ते आपल्या फायद्या करीताच करतो अशी तुकारामांची दृढ श्रद्धा झाली.
लेखक –
प्रा. डॉ. शोभा गायकवाड
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित शिक्षक, अमरावती.
संपर्क – 9423279432
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड
लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.







2 thoughts on “बरे झाले देवा निघाले दिवाळे…”
Bài viết rất hữu ích, cảm ơn đã chia sẻ! Letco là công ty tư vấn du học Hàn Quốc uy tín, hỗ trợ trọn gói từ hồ sơ, visa đến học bổng. Tham khảo thêm tại letco.vn nhé.
spielautomaten Online Casino Mit Google Pay Bezahlen hessen