अखेर पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; नाशिकची धुरा सांभाळण्यासाठी गिरीश महाजन, तर रायगडची जबाबदारी भरत गोगावले यांच्या पदरात 

SHARE:

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा आणि उत्सुकतेचा विषय ठरलेला रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. राज्य शासनाकडून सोमवारी (दि. १७) अधिकृत परिपत्रक जाहीर करण्यात आले असून, यात तब्बल दोन वर्षांपासून बहुप्रतिक्षित नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यानुसार, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोपवण्यात आले आहे, तर शिवसेनेचे आक्रमक नेते तथा मंत्री भरतशेठ गोगावले यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले आहे.

महायुतीमधील दीर्घकालीन रस्सीखेच संपली –
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्री संदर्भात पदेवाटप झाले होते, परंतु नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून सत्ताधारी पक्षांमध्ये (विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपमध्ये) जोरदार रस्सीखेच सुरू होती. जानेवारी २०२५ मध्ये या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाच्या घोषणा झाल्यानंतर तात्काळ त्यावर स्थगिती आणण्यात आली होती. तेव्हापासून हे दोन्ही महत्त्वाचे जिल्हे पूर्णवेळ पालकमंत्र्यांच्या प्रतीक्षेत होते. अखेर सर्व बाबींवर आणि मित्रपक्षांमधील समन्वयावर व्यापक चर्चा केल्यानंतर शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

रायगडच्या पालकमंत्रिपदी अखेर भरत गोगावले यांची बाजी –
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेनेचे नेते भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदिती तटकरे यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळाली होती. भरत गोगावले हे या पदासाठी सुरुवातीपासूनच अत्यंत आग्रही होते. नुकत्याच १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त रायगड जिल्ह्यात ध्वजारोहणाचा मान भरत गोगावले यांना मिळाला होता, तेव्हापासूनच ते रायगडचे पालकमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आज शासनाच्या अधिकृत घोषणेनंतर गोगावले समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांचा हा प्रदीर्घ संघर्ष अखेर फळाला आला आहे.

नाशिकची धुरा अनुभवी गिरीश महाजन यांच्या हाती –
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भाजपचे संकटमोचक आणि अनुभवाचे धनी असलेले गिरीश महाजन यांच्या नावावर पुन्हा एकदा पसंतीची मोहोर उमटवण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याचे राजकारण आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पालकमंत्रिपदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. जरी औपचारिक घोषणा उशीरा झाली असली, तरी महाजन यांनी यापूर्वीही प्रशासकीय पातळीवर नाशिकच्या विकासात्मक कामांमध्ये आणि कुंभमेळ्याच्या तयारीमध्ये सक्रिय सहभाग ठेवला होता. आता अधिकृत जबाबदारी मिळाल्यामुळे नाशिकच्या विकासाला अधिक वेग येईल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

प्रशासकीय कामकाजाला मिळणार गती –
या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाच्या घोषणा झाल्यामुळे रखडलेली विकासकामे, जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) बैठका आणि प्रशासकीय निर्णय वेगाने मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महायुती सरकारने घेतलेल्या या संतुलित निर्णयामुळे दोन्ही जिल्ह्यांमधील राजकीय अनिश्चितता संपली असून आगामी काळात विकासकामांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

मुख्य संपादक सा. रयत रक्षक, महाराष्ट्र. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र.

Leave a Comment