नागपूर : जलसंधारण व पाणी प्रश्नाप्रती अधिकाधिक जनजागृती व्हावी या उद्देशाने माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित ‘वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाला युवकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने आयोजित वॉकेथॉनचा शुभारंभ आमदार चरणसिंह ठाकूर यांनी हिरवा झेंडा दाखवून केला.

भविष्यातील जल संकटांवर मात करण्यासाठी जलसाक्षरता ही काळाची गरज असून पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी वाचवा व देश समृद्ध करा’ असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, अधीक्षक अभियंता हनुमंत खटके, अधीक्षक अभियंता विपीन साखरकर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी वैभव सोनोने, राजेंद्र शाम, सावन जयस्वाल, श्रीकांत ढोके, वरिष्ठ भूवैज्ञानिक वर्षा माने, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, जलअभ्यासक प्रवीण महाजन आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यात सुरू असलेली जलसंधारणेच्या चळवळीत अधिकाधिक लोकसहभागासाठी हा उपक्रम प्रत्येकाच्या मनात विश्वास निर्माण करणारा ठरला. शाश्वत विकासासाठी मृद व जलसंधारणाचे महत्त्व जनमानसात पटवून देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जलस्त्रोतांचे संवर्धन व पाण्याचा जबाबदारीने वापर करण्याचा संदेश युवकांनी ‘वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमातून दिला. सकाळी सहा वाजता सिव्हिल लाईन्स येथील लेडीज क्लब येथून ‘महा वॉकेथॉन – ‘वॉक फॉर वॉटर’ रॅलीची सुरवात झाली. रॅलीच्या यशस्वितेसाठी अधीक्षक अभियंता हनुमंत खटके, कार्यकारी अभियंता विपीन साखरकर, सावन जयस्वाल, श्रीकांत ढोके, वैभव सोनोने यांनी परिश्रम घेतले.
रॅलीत एनसीसी, एनएसएस, विविध युवा संघटना, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी हातात जलसंरक्षणाचे फलक घेऊन आपला सहभाग नोंदवला.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
मुख्य संपादक सा. रयत रक्षक, महाराष्ट्र. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र.






