आम्ही जातो अमुच्या गावा l अमुचा राम राम घ्यावा ll

SHARE:

तुका म्हणे, शोभा सांगे…

       नुकतीच तुकाराम बीज सर्वत्र साजरी झाली. तुकारामांचे प्रयाण फाल्गुन वद्य द्वितीयेला झाले. शके १५७१ (सन १६५०) हा त्यांचा प्रयाण काळ सर्वानुमते मान्य झाला.

  तुकारामासारख्या महान हस्तीचे या जगातून जाणे निश्चितच आनंददायी नाही. हा दिवस सात्विक, संस्कारी, सज्जन तुकारामांना अभिवादन करण्याचा आहे. पण ह्या दिवसाचे गांभीर्य नसणाऱ्या अनेक लोकांनी सोशल मीडिया वर शुभेच्छांचे मेसेज दिलेले आहेत. आज तुकोबांना अभिवादन करून नतमस्तक होण्याचा दिवस आहे.
तुकराम सदेह वैकुंठाला गेले अशी भाविकांची श्रद्धा आहे. खुद्द तुकारामांचे अभंग

कुडिसहित झाला तुका गुप्त l
देहासहित तुका वैकुंठ वासी ll
अशी साक्ष देतात.

   तुकोबांना वैकुंठाला जाण्याचा निदिध्यास लागला होता. तेच वैकुंठ पिठ आपल्या  घरी आल्याचे त्यांनी पाहिले, प्रत्यक्ष भगवंत तुकोबांच्या घरी गरुडावर बसून आले,असे तुकोबा आपल्या अभंगातून सांगतात. हे वैकुंठ पीठ म्हणजे तुकोबांचे पंढरपूरच. त्यांना पंढरपूरच्या विठोबाचाच ध्यास लागला होता. वैकुंठ  हा शब्द वापरल्याने लोकांनी त्याचा शब्दश:  अर्थ घेतलेला दिसतो,

आम्ही जातो अमुच्या गावा l
अमुचा राम राम घ्यावा ll
राम कृष्ण मुखी बोला l
तुका जातो वैकुंठाला l

शके १५७१ फाल्गुन वद्य द्वितीया शनिवार दिवस उजाडला. देहू येथेच नांदुर्गीच्या  वृक्षाखाली कीर्तनाला प्रारंभ झाला. अवती भोवती खूपच जन समुदाय जमला होता. त्यावेळी तुकारामांच्या नामसंकीर्तन तसेच भक्तीची पराकाष्ठा झाली. कीर्तनात आलेल्या सकल संत व सज्जनांना तुकोबांनी भक्तीच्या रसात आकंठ बुडवून टाकले. दोन प्रहरानंतर त्यांनी कीर्तन थांबवून ते म्हणाले,

वाड वेळ झाला, उभा पांडुरंग l
वैकुंठा श्रीहरी बोलवतो ll
अंतकाळी विठो आम्हासी पावला l
कुडी सहित झाला तुका गुप्त ll

  तेव्हा पासून शरीरासह गरुडावर बसुन तुकोबा वैकुंठाला गेले अशी आख्यायिका रूढ झाली असावी. असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी मांडले आहे. त्यानी तुकारामांना प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढणारा “विद्रोही संत”. मानले आहे. याउलट शंकर चतूर्कर यांनी “धन्य तुकोबा समर्थ सदेह वैकुंठगमन” लिहून मान्यता दिली. भक्त जन तुकाराम महाराज सदेह वैकुंठात गेले याच विचारावर जगतात. इतिहास तज्ज्ञ पण योगशास्त्र अनभिज्ञ बुद्धीवादी तुकारामांनी जलसमाधी घेतली असा तर्क करतात. तर काही म्हणतात, महाराज भजनकिर्तनात निमग्न असताना त्यांना इंद्रायणीत नेऊन बुडविले. तुकारामांचे चरित्रकार महिपती यांनी

तो जगद्गुरु तुका वैष्णव भक्त l
तई समई होतेसे गुप्त ll

असे म्हटल आहे. डॉ. श. दा. पेंडसे कीर्तनातून वाराणसीला पोचून गंगेच्या काठाने उत्तरेला गेले असे म्हणतात.

  श्री सुदाम सावरकरांनी “तुकाराम वैकुंठगमन की खून ?” या ग्रंथात वास्तववादी  दृष्टिकोनातून विचार मांडले. तुकारामाच्या सदेह वैकुंठगमनावर बरेच वाद आहेत. स्वतः तुकोबांनी या प्रसंगावर चोवीस अभंग लिहिले आहेत. त्यामुळे भक्तगणाना स्वर्गारोहण सत्य वाटते. आजच्या विज्ञानयुगात राहणाऱ्या बुद्धिवादी माणसाचा त्यावर कसा विश्वास बसेल? समजा हा प्रकार खरेच घडला असता तर भक्त जन श्रध्दापूर्वक तुकोबांना निरोप देण्यासाठी आले असते. तुकारामांचे अभंग लिहिणाऱ्या जगनाडे बुवांनी त्या निर्याणाचे वर्णन लिहून ठेवले असते. तुकाराम एकाएकी अदृश्य झाल्याचा वादही निर्माण झाला नसता. प्रत्यक्षदर्शी नामदेवाने नाही का ज्ञानेश्वरांच्या समाधी सोहळ्याचे वर्णन लिहून ठेवले.
तुकाराम अत्यंत गूढ पद्धतीने नाहीसे झाले. त्याचा पुरावा उपलब्ध नाही. तुकाराम कवी असल्याने आकंठ भक्तीत बुडालेल्या तुकोबांची सदेह वैकुंठगमन ही त्यांच्या  कविमनाच्या कल्पना शक्तीची भरारी आहे. त्यांना विठ्ठल भक्तीची ओढ होती. त्या उत्कट भक्तीतून ते अभंग लिहिल्या गेले असावे. हीच शक्यता वाटते.

लेखक –
प्रा. डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित शिक्षक,
साहित्यिक तथा कवी
संपर्क – ९४२३२७९४३२

डॉ. शोभा माधव गायकवाड
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड

लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment