तुका म्हणे, शोभा सांगे…
कुटुंबातील अगदी जवळच्या लोकांचे झालेले मरण,१९५२ चा झालेला महाभयंकर दुष्काळ, संसारात आलेल्या अडचणी, आलेली संकटे या सर्वांमुळे तुकारामांना जीवनाच्या क्षणभंगुरतेची कल्पना आली. अशावेळी तुकारामांनी अंतर्मुख होऊन परमार्थाची निवड केली.
म्हणजे नेमके काय केले? तर पूर्वीच्या संसारी वृत्तीला दूर सारले. परमार्थाच्या आड येणारे देहप्रेम, इंदियभोग, लालसा यांना पूर्णपणे दूर ठेवले. या साऱ्या वृत्तीवर प्रयत्न पूर्वक विजय मिळविला. पूर्वीचे संसारी तुकाराम या वळणावर संपले.
परमार्थ मार्गाकडे वळल्यामुळे, त्यांचा कल ईश्वरभक्तीकडे वाढू लागला. त्यांचा परमार्थ मार्गातील अधिकार वाढला. परमार्थ मार्गातील पुढील पायरी सिद्धावस्था. त्यांची सिद्धावस्थेकडे जाण्याची वाटचाल सुरू झाली.त्यासाठी तुकारामांची तयारी सुरू झाली.
त्यासाठी तुकारामांनी काय केले?
या अवस्थेतील तुकारामाचा संयम पाहण्यासारखा आहे. त्यांनी मनावर प्रचंड ताबा ठेवला.
सुरुवातीला लोकांनी चेष्टा सुरू केल्या. तुकारामांना राग आला नाही असे म्हणण्यापेक्षा तुकारामांनी राग मानलाच नाही.तुकारामांची ही एक प्रकारे परीक्षाच होती. रागालोभाच्या पलीकडे गेलेले तुकाराम या परीक्षेत उत्तीर्ण झाले. आणि परमार्थात स्थिरावले.
बरे झाले देवा कुणबी केले.!
असे म्हणून त्यांनी देवाचे आभार मानले. उच्च जातीत जन्मले असते तर त्यांना दंभ आला असता असे त्यांना वाटले. म्हणूनच त्यांनी दुष्काळालाही देवकृपा मानले. तुकारामांची सिद्धावस्थेसाठी जय्यत तयारी चालू होतीच. पुढे त्यांनी तीव्र वैराग्य अंगी बाणले. हे गुरूकृपेचे किंवा शुभचिन्हच असावे, असे त्यांनी मानून घेतले. आयुष्यातील मंगल प्रभातीची, मंगलवेळ असावी असे तुकारामाच्या बाबतीत घडू लागले.तुकाराम असे अंतर्यामी बदलले. हा बदल लक्षात येण्यासारखा होता..
तुकाराम आपल्या अभंगात सांगतात.
उजळले भाग्य आता l
अवघी चिंता वारली ll
संतदर्शने हा लाभ l
पद्मनाभ जोडला ll
माघ शुद्ध दशमी, शके१५५४ रोज गुरुवार हाच तो दिवस होता. या दिवशी त्यांची अवघी चिंता दूर झाली. संतदर्शनाचा लाभ आणि पद्मनाभाचीही प्राप्ती झाल्याने त्यांच्या मुखातुन प्रासादिक उत्तरे बाहेर पडू लागली. जणू देवच त्यांच्या मुखातून बोलू लागला. त्यांच्या मुखातून बाहेर पडणारी अमृतवाणी लोकांना आवडू लागली. त्यांच्या अमोघ वाणी मुळे किर्तनालाही रंग चढू लागला.
तुका म्हणे होता ठेवा l
तो या भावा सापडला ll
यानंतर तुकारामांना स्वप्नात आणखी एक महत्त्वाचा दृष्टांत झाला.
नामदेव केले स्वप्नामाजी जागे l
सवे पांडुरंगे येऊनिया ll
प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी l
उरले ते शेवटी लावी तुका ll
संत नामदेव प्रत्यक्ष पांडुरंगाला घेऊन त्यांच्या स्वप्नात आले. या दर्शना मुळे देवाचा आणि संताचा प्रसाद प्राप्त झाला. या दर्शनामुळे तुकारामांना अभंग रचण्याची प्रेरणा मिळाली. मी शंभर कोटी रचना करण्याची प्रतिज्ञा केली होती. त्यापैकी ९६ कोटी रचले. उरलेले बाकीचे तू पूर्ण कर, असे नामदेवाने स्वप्नात सांगितलेले काम आपण पूर्ण केलेच पाहिजे. असा ध्यास त्यांनी घेतला. अभंग रचना करता करता ते साधनाही करू लागले. त्याद्वारे देवाच्या अधिक जवळ जाण्याचा, देवाला जाणण्याचा प्रयत्न करू लागले, ह्या साधने द्वारे त्यांची साधक अवस्था वाढत वाढत जाऊन त्यांना उच्च कोटींचे अनुभव येऊ लागले.
क्षराक्षर वेगळा l
तुका होऊनी निराळा ll
पाहे निगमकळा l
बोले विठ्ठल प्रसादे ll
तुकारामाच्या मुखातून अमृताचे बोल पाझरू लागले. त्यांच्या मुखातून अमृतवाणी स्त्रवत असली तरी तुकाराम विठ्ठल प्रसाद आहे, असेच लोकांना सांगू लागले.
आपुलिया बळे l
नाही मी बोलत ll
तुकाामांना गुरुकृपा झाली. त्यांना स्वप्नात संत नामदेव आणि विठ्ठल यांनी दर्शन दिले या स्वप्न दर्शनाने तुकाराम कृतार्थ झाले. स्वप्न दर्शनालाच त्यांनी गुरुकृपा मानली.
बाबाजी चैतन्य या सत्पुरूषाने त्यांना स्वप्नात येऊन दर्शन दिले आणि मस्तकावर हात ठेवून रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. त्या मंत्राचा अहोरात्र ते जप करू लागले. त्या बरोबरच त्यांनी अनेक साधनेही केली.
एका स्थितीतून दुसरीत, दुसऱ्या स्थितीतून तिसरीत असे ते वरच्या पातळीत जाऊ लागले. तसे त्यांच्या वाणीतून गूढ अध्यात्मिक, सिद्धांत सहजरीत्या बाहेर पडू लागले. त्यांनी गीतेवर अभंगबध्द, मंत्रगीता तयार केली. उपनिषदे, आणि वेदांचा अभ्यास करून त्यातील सार आपल्या रसाळ वाणीतून अभांगाद्वारे सांगितले आणि अभंग असा कवित्वाचा भर मात्र देवाच्या माथी टाकला.
लेखक –
प्रा. डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक,
साहित्यिक व कवी
संपर्क – ९४२३२७९४३२
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड
लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.






