वरूड : वरूड नगर परिषदेत भारतीय जनता पार्टीची सत्ता अधिक भक्कम होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, या राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी ईश्वर चिट्ठीने स्वीकृत नगरसेवकपदी निवड झालेले वरिष्ट पत्रकार प्रवीण सावरकर ठरले आहेत. बुधवारी दुपारी १ वाजता झालेल्या विशेष सभेत भाजपच्या कविता नरेंद्र उपरकर यांची उपाध्यक्षपदी निवड झाली तर योगेश्वर खासबागे, राहुल आगरकर आणि प्रवीण सावरकर यांची स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करण्यात आली. यामध्ये तिसऱ्या स्वीकृत सदस्य पदासाठी झालेली चुरशीची लढत व त्यातून ईश्वर चिट्ठीने भाजपच्या प्रवीण सावरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने सभागृहात विशेष चर्चेला उधाण आले.

वरूड नगर परिषदेत एकूण २६ नगरसेवक असून भाजपचे १८, अपक्ष १, प्रहार १, काँग्रेस २ तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ४ नगरसेवक आहेत. भाजप, अपक्ष, प्रहार व काँग्रेस मिळून २२ सदस्यांचा अधिकृत गट जिल्हाधिकाऱ्यांच्या साक्षरीने स्थापन झाल्याने स्वीकृत नगरसेवकपदी भाजपचे दोन सदस्य निश्चित झाले होते. मात्र तिसऱ्या सदस्य पदासाठी तौलनिक संख्याबळाची स्थिती निर्माण झाली. तौलनिक संख्येनुसार भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडे प्रत्येकी चार-चार सदस्य असल्याने दोन्ही पक्षांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. यावेळी ईश्वर चिट्ठी भाजपच्या नावावर निघाल्याने भाजपकडून प्रवीण सावरकर यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड जाहीर करण्यात आली.

या निवडणूक प्रक्रियेत लोकनियुक्त नगराध्यक्ष ईश्वर सलामे हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते तर मुख्याधिकारी गजानन भोयर यांनी प्रक्रिया पार पाडली. ईश्वर चिट्ठीच्या माध्यमातून झालेली प्रवीण सावरकर यांची निवड ही केवळ योगायोग नसून भाजपची मजबूत मांडणी व अचूक राजकीय रणनीतीचे प्रतीक मानली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेत आमदार चंदू उर्फ उमेश यावलकर यांची भूमिका निर्णायक ठरली असून, तीनही स्वीकृत नगरसेवक भाजपचे करून त्यांनी आपली राजकीय चाणक्यनीती पुन्हा सिद्ध केली आहे. प्रवीण सावरकर यांच्या निवडीमुळे वरूड नगर परिषदेत भाजपची सत्ता अधिक भक्कम झाल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, आगामी काळात नगरपरिषदेत भाजपचा प्रभाव आणखी वाढणार असल्याचे संकेत या निकालातून मिळाले आहेत.





