धावती लोकल पकडण्याच्या नादात नवविवाहितेचा दुर्दैवी अंत; बदलापूर रेल्वे स्थानकावरील घटना

SHARE:

ठाणे – बदलापूर रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. कामावर जाण्यासाठी निघालेल्या एका २८ वर्षीय तरुणीचा धावत्या लोकलमध्ये चढण्याच्या प्रयत्नात खाली पडून करुण अंत झाला. या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले असून, ते पाहून सर्वांचाच थरकाप उडाला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मृत महिलेचे नाव चेतना चंद्रशेखर देवरुखकर (वय २८) असे असून, त्या बदलापूर पूर्वेकडील ज्युवेली परिसरातील ‘जगन्नाथ गॅलेक्सी’ या सोसायटीत वास्तव्यास होत्या. चेतना यांचे अवघ्या वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते आणि त्या ठाण्यातील एका खासगी कंपनीत नोकरीला होत्या. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयात जाण्यासाठी त्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आल्या होत्या.

सकाळी साधारण ८ वाजून १० मिनिटांच्या सुमारास मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (CSMT) जाणारी जलद लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर आली होती. लोकल प्लॅटफॉर्मवरून सुटत असतानाच चेतना तिथे पोहोचल्या. समोरून गाडी निघून जात असल्याचे पाहून त्यांनी धावत्या लोकलच्या महिला डब्यात चढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी डब्याच्या हँडलला हातही घातला, परंतु दुर्दैवाने त्यांचा पाय घसरला आणि तोल गेल्याने त्या थेट रेल्वे रुळावर कोसळल्या. यावेळी वेगात असलेल्या लोकलचा त्यांना जबर धक्का बसला, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ही संपूर्ण दुर्घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस आणि स्टेशनवरील इतर प्रवाशांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेमुळे देवरुखकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. घाईगडबडीत धावती लोकल पकडणे किती जीवावर बेतू शकते, याचे हे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा