विद्यार्थिनीला चापट मारणे शिक्षिकेला पडले चांगलेच महागात, कोर्टाने सुनावली तीन वर्ष तुरूंगवासाची शिक्षा

SHARE:

गुजरात – गांधीनगर येथील एका शाळेतील शिक्षिकेला वर्गातील विद्यार्थ्याला चापट चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी गुजरातमधील एका न्यायालयाने शिक्षिकेला तीन वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी हिमांशू चौधरी यांनी ३० जानेवारी रोजी महिला शिक्षिकेला दोषी ठरवले. न्यायालयाने म्हटले की शिक्षिकेच्या क्रूरतेमुळे १४ वर्षांच्या मुलीला गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे श्रवणशक्ती कमी झाली आणि तिला दीर्घकाळ उपचार करावा लागला.

गांधनगर येथील एका शाळेतील शिक्षिकेने गृहपाठ न केल्यामुळे नववीच्या विद्यार्थिनीला चापट मारली. शिक्षिकेने मारलेली चापट इतकी गंभीर होती की विद्यार्थिनीचा डावा कानाचा पडदा फाटला आणि तिच्या श्रवणशक्तीवर परिणाम झाला. ही घटना १ जानेवारी २०२० रोजी गांधीनगरमधील बा श्री वसंतकुंवबा शाळेत घडली. या घटनेच्या दोन दिवसांनी मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून सेक्टर २१ पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

न्यायालयाने शिक्षिका पारुलबेन पटेल हिला आयपीसीच्या कलम ३२५ आणि बाल न्याय कायद्याच्या कलम ७५ अंतर्गत दोषी ठरवले आणि तिला तीन वर्षे आणि तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आणि ही रक्कम पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे निर्देश दिले. या घटनेला साडेचार वर्षे उलटूनही पीडितेला औषधोपचार करावे लागत आहे, असेही न्यायालयाने नमूद केले.
शिक्षिकेने आपला बचाव करताना न्यायालयाला सांगितले की विद्यार्थिनी गृहपाठ करत नव्हती आणि मनमानी करत होती. शिक्षिकेने दावा केला की जेव्हा तिच्या पालकांना हे कळले तेव्हा त्यांनी तिच्याविरुद्ध खोटा खटला दाखल केला. मात्र न्यायालयाने वैद्यकीय साक्षीदारांची साक्ष आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेली माहिती विचारात घेतल्यानंतर आरोपींविरुद्ध आरोपांना पुष्टी मिळाली.

मात्र, सुनावणीदरम्यान, शिक्षिकेच्या वकिलाने शिक्षा कमी करण्याची विनंती केली कारण ती कर्करोगाने ग्रस्त होती. न्यायालयाने म्हटले कि शिक्षा कमी केल्याने प्रतिबंधात्मक उपाय आणि बाल संरक्षणाचा उद्देश अपयशी ठरेल. शिवाय, कर्करोगाच्या निदानाचे समर्थन करण्यासाठी कोणतेही कागदोपत्री पुरावे सादर केलेले नाहीत, असे म्हणत न्यायालयाने शिक्षा कमी करण्यास नकार दिला.

Leave a Comment

अधिक वाचा