मतदारांनी घराणेशाही नाकारली, जिल्हा परिषद निवडणूकीत मंत्री, आमदार, खासदारांना मोठा झटका

SHARE:

मुंबई – राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल हाती येत असून अनेक ठिकाणी धक्कादायक आणि आश्चर्यजनक निकाल पाहायला मिळत आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी घराणेशाहीला नाकारल्याचे चित्र आहे. सोलापूरमध्ये आमदार, खासदारांच्या नातेवाईकांना पराभवाचा धक्का बसलाय. साताऱ्यात मंत्री मकरंद पाटील यांना जोरदार धक्का बसलाय. परभणीतही ते चित्र आहे. येथे भाजपचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातील ५  पैकी ४  जणांना पराभव स्वीकारावा लागला.

सातार्यात राज्याचे मंत्री मकरंद पाटील यांना होमग्राऊंडवर जबर धक्का बसलाय. महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव गटात शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार अजित सपकाळ यांनी विजय खेचून आणला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय गायकवाड यांचा पराभव केला आहे. तळदेव गटातून निवडून आलेले अजित सपकाळ हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. तर माण तालुक्यातील कुकडवाड गटात मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अरुण गोरे पिछाडीवर आहेत.

परभणीत भाजपचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातील ५  पैकी 4 जणांना पराभवाला समोर जावे लागले. सुरेश वरपूडकर यांची कन्या सोनल देशमुख या झरी जिल्हा परिषद गटातून मशालीच्या चिन्हावर उभ्या होत्या. मात्र, सोनल वरपूडकर यांना पराभव पत्कारावा लागला आहे, भाजपचे उमेदवार दिलीप देशमुख यांनी त्यांचा पराभव केलाय.
दुसरीकडे त्यांचे चिरंजीव समशेर वरपूडकर हे शिंगणापूर जिल्हा परिषद गटातून उभे होते त्या ठिकाणी मशाल या चिन्हावर उभे असलेले पांडुरंग खिल्लारे यांनी समशेर वरपूडकर यांचा पराभव केला. दुसरीकडे त्यांच्या सुनबाई प्रेरणा वरपूडकर या दैठणा जिल्हा परिषद गटातून निवडणुकीसाठी उभ्या होत्या, त्या ठिकाणीही काँग्रेसच्या ज्योत्स्ना गणेश घाडगे यांनी त्यांचा पराभव केलाय. त्यामुळे वरपूडकर यांचे घरातील तीनही उमेदवार पराभूत झाले आहेत.

लोहगाव जिल्हा परिषद गटात सुरेश वरपडूकर यांचे दोन पुतणे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यातील, काँग्रेसच्या चिन्हावर उभे असलेले अजित वरपूडकर यांनी भाजपकडून उभे असलेल्या ऐश्वर्य वरपुडकर यांचा पराभव केला. त्यामुळे, जिल्हा परिषदेसाठी ५  पैकी केवळ एका जागेवर सुरेश वरपूडकर यांना विजय मिळवता आला आहे, येथे त्यांचा पुतण्या विजयी झाला आहे.

कोल्हापुरात जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेचे नेते सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला. कोल्हापुरच्या उचगाव मतदारसंघात एक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा भाजप उमेदवार विजयी झाला. कोल्हापुरातील उचगाव मतदारसंघ हा काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा बालेकिल्ला समजला जात होता. याच मतदारसंघात भाजपने प्रतिस्पर्धी उमेदवार दिला होता. उचगाव मतदारसंघात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार नामदेव वाईंगडे यांचा विजय झालेला आहे. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार कीर्ती कुमार मसुटे यांचा पराभव केलेला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या बालेकिल्लातच काँग्रेसच्या उमेदवाराचा भाजप उमेदवाराने पराभव केला. काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे आमदार सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.

रायगढमध्ये भाजपच्या खासदारांना पराभवाचा जोरदार धक्का बसलाय आहे. रायगड जिल्हा परिषदेत भाजपचे राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी निवडणूक रिंगणात होत्या. पण त्यांनाही पराभवाचा धक्का बसलाय. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने निलीमा पाटील यांचा ३५०० मतांनी दारूण पराभव केला. निलीमा पाटील यांच्या पराभवामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये निराशाचे वातावरण आहे. यातून असेच दिसून येते कि मतदारांनी जिल्हा परिषद निवडणुकीत घराणेशाहीला स्पष्टपणे नाकारले आहे. पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत ७३ जागांपैकी तब्बल ४३ जागांवर विजय मिळवत अजितदादांच्या राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा