नवी दिल्ली – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत अनेक प्रश्न उपस्थित करत १०० टक्के घातपात असल्याचा गौप्यस्फोट केला. यानंतर आता रोहित पवार यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत आणखी एक खळबजनक दावा केला आहे. त्यांनी सांगितले कि डॉक्टरांच्या मते, अजित दादांचे शरीर अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने जास्त सूजलेले होते.
बुधवारी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी नवीन खुलासा केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही बाब आपण सांगितली नव्हती असंही ते म्हणाले. ज्यावेळी अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला, त्यावेळी त्यांचे सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. त्यामध्ये अजित पवारांचा मृतदेह मोठ्या प्रमाणात फुगल्याचा दावा केला जात होता. तो मृतदेह अजित पवारांचा आहे का? याबाबतही संभ्रम होता.
त्यानंतर आता फुगलेल्या मृतदेहाबाबत रोहित पावरांनी माहिती देताना म्हटलं की डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अजितदादांची बॉडी खूप सुजलेली होती. मी जेव्हा त्यांना विचारलं भाजल्यानंतर शरीर सुजतं का? त्यावर डॉक्टर हो म्हणाले. अजित दादांची बॉडी असामान्यपणे खूप जास्त सुजलेली होती. असं डॉक्टरांनी सांगितले. ती का इतकी सुजलेली होती, ते पाहणंही महत्त्वाचं आहे, अशी नवी माहिती रोहित पवारांनी दिली. रोहीत पवारांच्या या गौप्यस्फोटाने खळबळ उडाली असून पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
रोहित पवारांनी या उड्डाणासाठी नियुक्त केलेल्या वैमानिकांच्या निवडीवरही प्रश्न उपस्थित केले आहे. ज्या कॅप्टन कपूर यांची नियुक्ती करण्यात आली, त्यांच्यावर यापूर्वी शिस्तभंग आणि अल्कोहोल चाचणीत अपयशी ठरल्याचे गंभीर आरोप होते. अशा विवादित वैमानिकाकडे व्हीआयपी सुरक्षेची जबाबदारी का सोपवण्यात आली? असा प्रश्न त्यांनी केला. तसेच, मूळ पायलट मुंबईतील ट्रॅफिकमुळे पोहोचू शकले नाहीत, हे प्रशासनाचे कारण फेटाळताना पहाटेच्या वेळी मुंबईत कोणते ट्रॅफिक असते?“ असा थेट सवाल त्यांनी केला.
अपघाताच्या वेळी विमानातील सुरक्षा यंत्रणांनी काम का केले नाही, यावरही रोहित पवारांनी बोट ठेवले आहे. विमानाचे स्थान सांगणारे ट्रान्सपॉन्डर कार्यरत का नव्हते आणि विमानाला अडचण आल्यावर वैमानिकाने मेडे कॉल का दिला नाही, याचे गूढ कायम आहे. विमानाची देखभाल आणि उड्डाणक्षमतेचे प्रमाणपत्र कोणी दिले, याची कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दादा प्रवासात कधीही धोका पत्करत नसत, मग ऐनवेळी विमान आणि पायलट का बदलले गेले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आतापर्यंत १३-१४ दिवसात काहीही तपास झाला नाही. याचा फक्त सीसीटीव्ही गोळा केला. त्यामुळे एवढ्या दिवसात कंपनीकडून काहीही खोटे पुरावे गोळा करण्यात येण्याची शक्यता आहे. या आधी याच कंपनीच्या विमानाचा दोन वर्षांपूर्वी एक अपघात झाला होता. पण त्यावर काहीही तपास झाला नाही. दोन वर्षांपूर्वी त्याचा रिपोर्ट आला नाही. तो रिपोर्ट दाबण्यात आला का? या व्हीएसआर कंपनीच्या विमानाला युरोपमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पण भारतात यावर काहीच कारवाई करण्यात येत नाही, असं रोहित पवार म्हणाले आहे.
कंपनीचा मालक विजय सिंग हा पोहोचलेला व्यक्ती आहे. तो कागदपत्रात छेडछाड करू शकतो. पुरावे नष्ट करू शकतो. चौकशीत हस्तक्षेप करू शकतो. यापूर्वीही त्याने प्रकरणं दाबली आहेत. त्यामुळेच या अपघाताची चौकशी सीआयडी, सीबीआय सोबतच कॅनेडीयन, यूके, यूएस किंवा फ्रान्स इथल्या कंपन्यांपैकी दोन कंपन्यांकडून करायला पाहिजे. विदेशातील कंपनी चौकशीत आल्यास अधिक चांगली चौकशी होईल. सीबीआय, सीआयडी, डीजीसीए यांच्यासोबत परदेशातील दोन कंपन्या कंपल्सरी चौकशीसाठी हव्यात, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.





