नाशिक – जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ६ महिने लांबणीवर पडणार आहेत. तर जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक राजवट येणार आहे. परंतु नाशिक जिल्ह्यातील प्रशासक संकल्पना रद्द करत काळजी वाहू सरपंच असे पद निर्माण करावे, अशी मागणी संबंधित ग्रामपंचायतींच्या सदस्याकडून केली जात आहे. राज्यातील नाशिक जिल्ह्यातील ६२२ गावातील ग्रामपंचायतींवर १५ फेब्रुवारी २०२६ पासून प्रशासक राज येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ-सुरगाणा हे २ तालुके वगळता जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात प्रशासक राज येणार आहे. तेव्हा एका प्रशासकावर अंदाजे १५ ते २० गावांच्या विकासाची जबाबदारी येणार आहे.
त्यामूळे प्रत्येक गावाचा विकास कसा साधला जाणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि १५ पंचायत समित्या यांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यात आता नाशिकमधील ६२२ ग्रामपंचायत निवडणुका या ६ महिन्यानंतर घेण्यात याव्या अशी मागणी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. डाबली गावाचे सरपंच यांनी सांगितले की, आता राज्यातील सरकार विरोधात ६२२ ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला आहे. एका पंचायत समितीला 4 विस्तार अधिकारी असतात.
एका विस्तार अधिकाऱ्याकडे २० ते २५ गाव असतात त्यामुळे ते कोणकोणत्या गावाकडे लक्ष देणार आहेत आणि एका सरपंचाकडे एक गाव असते. नाशिक जिल्ह्यात भविष्यात उन्हाळा, गुरांचा चारा, पाणी टंचाई अशा अनेक समस्या आहे. तेव्हा ज्यावेळी विधानसभा बरखास्त होते तेव्हा राज्याचा कारभार बघण्यासाठी काळजीवाहू मुख्यमंत्री हे काम बघतात. तसेच प्रशासक ही संकल्पना रद्द करत आताचे जे सरपंच आहेत त्यांना देखील काळजीवाहू सरपंच म्हणून आदेश काढावा. निवडणुका होईपर्यंत माजी सरपंचाला गावाचा कारभार बघू द्या अशी मागणी सचिन साळुंखे, नाळे गावातील सरपंचांनी व्यक्त केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील ६२२ गावांवर प्रशासक राज येणार आहे. मात्र याआधी जो विकास निधी मंजूर होता तो निधी बऱ्याच गावांमध्ये अधिकारी नसल्यामुळे कामात आला नाही. त्यातच आता नाशिक जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ६ महिन्यांसाठी लांबणीवर का टाकल्या? याचे कारण महाराष्ट्र शासनाला सांगावे लागेल. तर आता ६२२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका या नाशिक जिल्ह्यात प्रशासक राज लागल्यानंतर घ्याव्यात अशी मागणी, काही गावातील सरपंचांनी केली आहे. नाशिक जिल्हा परिषद मार्फत व पंचायत समिती कडून एक प्रस्ताव दाखल केला जाणार आहे.
पंचायत समितीचे आरोग्य, शिक्षण असे विविध विस्तार अधिकारी आहेत. त्यांची आम्ही प्रशासक म्हणून नेमणूक करणार आहोत. जास्तीत जास्त प्रशासक कसे नेमले जाणार याकडे आम्ही लक्ष देणार आहोत, असे प्रशासनाने म्हटले आहे. तसेच अद्याप निवडणूक होणार नाही. राज्यातील निवडणूक आयोगाकडून वॉर्ड रचना, पुनर्निरीक्षण करणे या बाबत कुठलाच आदेश आला नसल्याचे गटविकास अधिकारी वेंदे यांनी सांगितले आहे. एकंदरीत काही गावांतील सरपंचाकडून करण्यात आलेल्या काळजीवाहू सरपंच पदाची मागणी, तसेच लवकर ग्रामपंचायत निवडुकांचे कार्यक्रम घोषित करण्याची मागणी, प्रशासक ही संकल्पना रद्द करण्याची मागणी, या सगळ्या बाबींचा विचार करून आता सरकारने लवकर निर्णय घ्यावा ही मागणी नाशिकमधील नागरिकांनी केली आहे.





