मनोरंजन – छोट्या पडद्यावरील अत्यंत वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय रिॲलिटी शो म्हणून ‘बिग बॉस मराठी’ ओळखला जातो. सध्या सुरू असलेल्या ‘बिग बॉस मराठी’ च्या सहाव्या पर्वाने अल्पावधीतच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पर्वात दररोज नवीन ड्रामा, कुरघोड्या आणि स्पर्धकांमधील टोकाचे वाद पहायला मिळत आहेत. मात्र, या आठवड्याच्या ‘भाऊच्या धक्क्या’वर होस्ट रितेश देशमुखचा रुद्र अवतार पहायला मिळाला आहे. रितेशने घरातील एका सदस्याला तिच्या वर्तणुकीमुळे थेट बाहेरचा रस्ता दाखवल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
या आठवड्यात रितेश देशमुखचा राग अनावर झाला असून, त्याने स्पर्धक रुचीता जामदार हिची चांगलीच शाळा घेतली आहे. शोच्या समोर आलेल्या नवीन माहितीनुसार, रितेशने रुचीताला तिच्या घरातील वागणुकीवरून खडेबोल सुनावले आहेत. रितेशने अत्यंत कडक शब्दांत आपला संताप व्यक्त करत म्हटले की, “रुचीता, तुम्ही या घराचा सर्वात मोठा व्हिलन ठरला आहात.” रुचीता घरात सातत्याने उद्धटपणे वागत असून, तिने अनेकदा खेळाच्या मर्यादा ओलांडल्याचे रितेशने सर्वांसमोर निदर्शनास आणून दिले.
विशेष म्हणजे, या आठवड्यात घडलेल्या एका गंभीर प्रसंगावर रितेशने बोट ठेवले. “तुम्ही थुंकलात…”, असे म्हणत रितेशने तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. घरातील टास्क रद्द करण्याचा प्रयत्न करणे, सतत नियम मोडणे आणि इतरांशी अरेरावी करणे, या गोष्टींमुळे रितेशचा पारा चढला होता. जेव्हा रुचीताने काही बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रितेशने तिला स्पष्ट शब्दांत ताकीद दिली. “माझ्याशी अशा प्रकारे बोलायचं नाही आणि मला काय करायचं हे तुम्ही सांगायचं नाही”, असे म्हणत रितेशने तिला गप्प केले.
परिस्थिती तेव्हा जास्त चिघळली जेव्हा रितेश देशमुखने केवळ शब्दांनीच सुनावले नाही, तर रुचीताला चक्क ‘भाऊच्या धक्क्या’वरून निघून जाण्यास सांगितले. “भाऊच्या धक्क्यावर अशा वागणुकीला आणि अशा माणसांना जागा नाही, तुम्ही आताच्या आता येथून जाऊ शकता”, असे आदेश रितेशने दिल्याचे दिसत आहे. या प्रकारामुळे घरातील वातावरण अत्यंत गंभीर झाले असून, रितेश देशमुखची ही आक्रमक भूमिका पाहून प्रेक्षकांमध्येही मोठी चर्चा रंगली आहे. आता यावर पुढे काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





