पशुधन संवर्धनातून कृषीक्षेत्राला नवसंजीवनी देणाऱ्या ‘महा पशुधन एक्स्पो २०२६’ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येथे प्रमुख उपस्थिती; यावेळी मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे सोबतच आमदार व इतर मान्यवर उपस्थित होते

SHARE:

बीड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परळी वैजनाथ, बीड येथे आयोजित ‘महा पशुधन एक्स्पो २०२६’ कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पशुधन संवर्धन ही काळाची गरज असून शेती आणि पशुधन यांचा परस्परसंबंध अत्यंत महत्त्वाचा आहे.
गोमातेचे महत्त्व लक्षात घेत राज्यात गोविकास आयोग स्थापन करण्यात आला असून गोमूत्र व शेणावर आधारित विविध उत्पादनांमुळे नव्या मूल्यसाखळीची निर्मिती होत आहे. नैसर्गिक शेतीकडे वळल्यास उत्पादनखर्च कमी होऊन उत्पन्न वाढू शकते, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

देशी गाईंचे संवर्धन, वैरण विकास कार्यक्रम आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर राज्य शासन विशेष भर देत आहे. पशुधन क्षेत्राचा विकासदर २५% पर्यंत नेण्याचे लक्ष्य राज्याने निश्चित केले आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने घोषित केलेल्या महिला शेतकरी वर्षाच्या पार्श्वभूमीवर महिला गोपालक, कुक्कुटपालक व शेळीपालक यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवले जाणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत महाराष्ट्रातील ३६६ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून यासाठी ₹२१४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मदर डेअरीच्या माध्यमातून दुग्धव्यवसाय विस्तारासाठी दुसऱ्या टप्प्यात १९  जिल्ह्यांचा समावेश करून ₹१५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच उदगीर येथील दूध भुकटी प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी ₹१०० कोटी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

पशुवैद्यकीय सेवांचे आधुनिकीकरण, फिरते पशुचिकित्सालय, पशु ॲम्ब्युलन्स आणि लंपीसारख्या आजारांवरील लसीच्या निर्मितीसाठी संशोधन यावर राज्य शासन कार्यरत आहे. कृषी क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादकता वाढवण्यासाठी ₹५०० कोटींचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून यात व पशुसंवर्धन क्षेत्राचाही समावेश करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कृषी व दुग्धव्यवसाय क्षेत्र शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरक्षित ठेवण्यात आल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. या पशुधन प्रदर्शनाच्या माध्यमातून शेती क्षेत्रातील नव्या संधी आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांसमोर मांडले जात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्कृष्ट पशुधनाच्या पशुपालकांचा व राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार प्राप्त पशुपालकाचा सत्कार केला.

Leave a Comment

अधिक वाचा