मुंबई – एका तरूणाच्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली आहे, या प्रकरणात एका तरूणास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सोशल मीडिया डेटिंग ॲपवरुन ओळख झालेल्या तरूणाने वर्षभराच्या रिलेशनशिपमध्ये एका डॉक्टर तरूणीचा मानसिक छळ केला आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणात फजल खान या तरूणाला अटक करण्यात आली आहे. मुंबई शहरातील अँटॉप हिल परिसरात ही आत्महत्येची घटना घडली आहे.
मुंबईत एका डॉक्टर तरुणीने सततच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुंबईत अँटॉप हिल परिसरात ८ मार्च २०२६ रोजी या तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली होती. ही तरुणी डॉक्टर असून तिचे नाव स्तुती बजरंग सोनावणे होते. याप्रकरणी मुंबईतील अँटॉप हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. डॉ. स्तुती बजरंग सोनावणे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फजल मोहम्मद खान वय ३१ याला मुंबई शहरातील लोअर परळ येथून अटक करण्यात आली आहे.
न्यायालयाकडून फजल मोहम्मद खान याला एका दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. डॉ. स्तुती सोनावणे यांच्या आत्महत्येमुळे मुंबईतील अँटॉप हिल परिसरात खळबळ उडाली आहे. मुंबईतील अँटॉप हिल पोलिसांना घटनास्थळावरून 6 पानांची सुसाईड नोट सापडली आहे. त्यात फैजल मोहम्मद खानकडून डॉ. तरूणीचा सतत मानसिक छळ होत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. फजल खान या तरूणाच्या मानसिक छळाची माहिती डॉ. स्तुतीने आपल्या मैत्रिणीला ही दिली होती.
डॉक्टर स्तुती सोनावणे आणि फजल खान यांची ओळख एका सोशल मीडिया डेटिंग ॲपवरुन झाली होती. त्यानंतर ते १ वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, या दोघांमध्ये सारखी भांडणे व्हायची. त्यावेळी फजल खानने तिला मारुन टाकण्याची धमकी दिली होती, अशी मुंबई पोलिसांकडून माहिती मिळाली आहे. यात रोजच्या मानसिक त्रासाला कंटाळून डॉ. स्तुती सोनावणे यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. ८ मार्च २०२६ रोजी डॉ. स्तुतीचे आई-वडील जेवण्यासाठी बाहेर गेले होते.
ते दोघे घरी परत आल्यावर डॉ. स्तुती तिच्या खोलीचा दरवाजा उघडत नव्हती. त्यावेळी डॉ. स्तुतीच्या वडिलांनी खोलीचा दरवाजा तोडला असता डॉ. स्तुतीने आत्महत्या केल्याचे लक्षात आले आहे. त्यावेळी मुंबईतील अँटॉप हिल पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. डॉ. स्तुती सोनावणे हिचा मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदन अहवालानुसार डॉ. स्तुती सोनावणे यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात अधिक तपास मुंबई पोलिस करत आहेत.





